संशोधकांना पहिल्यांदाच सापडली गर्भवती महिलेची ‘ममी’

जगभरात ‘ममी’वर अभ्यास करणाऱया अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाची घटना नुकतीच घडली. संशोधकांना गर्भवती महिलेची ममी सापडली आहे. एवढय़ा सुरक्षितपणे ठेवलेली गर्भवती महिलेची ‘ममी’ सापडण्याची जगातील ही पहिलीच घटना आहे. वास्तविक ती ‘ममी’ आतापर्यंत एक पुरुष पुजाऱयाची समजली जात होती. मात्र ती पुरुषाची नसून महिलेची ममी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

पोलंडचे संशोधक मारजेना ओजारेक जिल्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ममी 1826 साली वॉरसॉ म्युझियममध्ये आणण्यात आली होती. तिच्या ताबूतवर पुरुष पुजाऱयाचे नाव लिहिले होते. तेव्हापासून त्या ममीचा अभ्यास करण्यात आलेला नव्हता. मात्र आता एक्सरे आणि संगणकीय चाचण्यांतून नव्या गोष्टी समोर आल्या आहेत.

या ममीचे लांब केस आहेत. याशिवाय ममीच्या गर्भात बाळ होते. संशोधक मारजेना यांना सांगितले, ही गर्भवती महिला 20 ते 30 वर्षांची असावी. तिच्या पोटातील बाळाच्या डोक्याचा आकार बघून भ्रूण 26 ते 28 आठवडय़ांचे असावे, असा अंदाज आहे. वॉरसॉ म्युझियममध्ये गर्भवती महिलेच्या ममीवर अधिक संशोधन सुरू आहे. यासंदर्भातील अहवाल जर्नल ऑफ आर्पियोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या