पालघर जिल्ह्यातील नेहरोली येथे घडलेले तिहेरी हत्याकांड चर्चेत असतानाच या घटनेची पुनरावृत्ती आता कर्जत तालुक्यातील चिकणपाडा गावात घडली आहे. या गावात राहणाऱ्या पती, पत्नीसह त्यांच्या नऊ वर्षीय मुलाची मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या केली. या तिघांचे मृतदेह घरापासून जवळच असलेल्या एका नाल्यात फेपून देण्यात आले. पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.
कर्जत तालुक्यातील नेरळ शहरापासून काही अंतरावर चिकणपाडा गाव आहे. या ठिकाणी मदन पाटील (35) हा तरुण आपली पत्नी अनिशा (28) आणि मुलगा (9) यांच्यासह राहात होता. मूळचे कळंब बोरगाव येथील हे पुटुंब गेल्या 15 वर्षांपासून चिकणपाडा येथे राहात होते. आज सकाळी नऊच्या सुमारास या तिघांचेही मृतदेह नाल्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. नाल्यातील मृतदेह पाहून ग्रामस्थांनी तत्काळ नेरळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढल्यावर या तिघांच्याही अंगावर जखमांचे व्रण होते. त्यामुळे ही हत्याच असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मदन पाटील हा तरुण शांत स्वभावाचा म्हणून प्रसिद्ध होता. तेव्हा अशा पद्धतीने त्याचा अंत झालेला पाहून ग्रामस्थदेखील हळहळले. यासह मदन याची पत्नी अनिशा ही 7 महिन्यांची गर्भवती होती. नेरळ पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. तर याबाबत नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
कर्जत तालुक्यातील चिकणपाडा गावात गर्भवती महिलेसह तिचा पती आणि मुलाची हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर परिसरात घबराट पसरली आहे. ही घटना घडल्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींचा शोध घेणाऱ्या पोलीस पथकाला सूचना केला.मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.