
खालापुरात पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. लेटलतीफ १०८ रुग्णवाहिकेमुळे गर्भवती आदिवासी महिलेला आलिबाग जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी तब्बल दोन तास ताटकळत राहावे लागले. या केंद्राची रुग्णावाहिका गेल्या अनेक दिवसांपासून गॅरेजमध्ये असल्यामुळे ही वेळ आली आहे. सुदैवाने गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर असली तरी तिची फरफट झाल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
उंबरे येथे राहणारी गर्भवती अश्विनी वाघमारे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना परिधारारिक कल खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे हिमोग्लोबिन अचानक कमी झाल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी तिला अलिबाग जिल्हा रुग्णालात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्राची १०२ क्रमांकाची नवीन रुग्णवाहिका गॅरेजमध्ये असल्याने डॉक्टरांनी १०८ रुगवाहिकेशी संपर्क साधला. त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. दुसरी गाडी पाठवतो, असे सांगण्यात आले. पण ती पोहोचायला दोन तास लागले. अखेर मध्यरात्री रुग्णवाहिका गर्भवती महिलेला अलिबाग रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने महिलेची प्रकृती स्थिर आहे.
नवीन रुग्णवाहिका गॅरेजमध्ये पडून
खालापूर आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला दीड वर्षापूर्वी वडखळ येथे अपघात झाला होता. ही रुग्णवाहिका अद्यापही दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे वावले येथून या केंद्रासाठी १०२ क्रमांकाची नवीन रुग्णवाहिका देण्यात आली. मात्र बॅटरी चार्ज नसणे, स्टेरिंगमध्ये बिघाड अशा विविध कारणांमुळे ही रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून गॅरेजमध्ये पडून आहे.




























































