
रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करत आहे. यामुळे आजूबाजूच्या इतर देशांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्सी यांची फ्लोरिडा येथील ‘मार-आ-लागो’ निवासस्थानी भेट झाली. यावेळी त्यांनी रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या शांतता करारावर 20 मिनिटे युद्ध थांबवण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या हाताच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ट्रम्प यांच्या उजव्या हातावर मोठ्या प्रमाणात ‘मेकअप’ (कन्सीलर) लावल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या हातावरील ही खूण लपवण्यासाठी मेकअपचा वापर केल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही ट्रम्प यांच्या हातावर अशाच प्रकारच्या पट्ट्या आणि खुणा दिसल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडियावर ट्रम्प यांचे फोटो शेअर करत त्यांच्या हातावरील कन्सीलरला हायलाईट केले जात आहे. ट्रम्प यांच्या हातावर केलेला मेकअप चुकीचा आहे. त्यांच्या हातावर लावलेले कन्सीलर हे चुकीच्या शेडचे असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तर काहींनी ट्रम्प यांच्या हाताला इजा झाली असून ते सर्वांपासून लपवण्यासाठी त्यांनी हा मेकअप केला असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. तर काहींनी त्यांची तुलना ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या मालिकेतील ‘डेमोगॉरगॉन’ या पात्राशी करून त्यांची थट्टा केली आहे.
दरम्यान, व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या हातावरील या खुणा केवळ सततच्या हस्तांदोलनामुळे पडलेल्या साध्या जखमा असल्याचे स्पष्ट केले आहे.
























































