
प्रभादेवी येथील ‘रुस्तुमजी क्राऊन’ या टॉवरवर मुंबई पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे. 63 मजल्यांच्या या टॉवरमध्ये 138 फ्लॅट्सधारकांनी अनधिपृत बांधकामे आणि फेरबदल केले आहेत. यामध्ये राजकीय नेते, मंत्री आणि आमदारांच्या नातेवाईकांचे फ्लॅट असल्याने पालिका अधिकाऱ्यांवर मोठय़ा प्रमाणात दबाव येत असल्याने कारवाईचा वेग मंदावला आहे. दोन दिवसांत फक्त नऊ फ्लॅट्सवर हातोडा चालवला. त्यामुळे कारवाई थांबणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
‘रुस्तुमजी क्राऊन’ टॉवरच्या तिसऱ्या विंगला ओसी मिळालेली नाही. ए आणि बी विंगमधील बहुतांश फ्लॅटधारकांनी अतिक्रमण केले आहे. या बळकावलेल्या जागेचे बाजारमूल्य 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कारवाईच्या कक्षेत मंत्री संजय राठोड, त्यांची पत्नी शीतल राठोड, माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांच्या फ्लॅट्सचा समावेश आहे. तसेच याच टॉवरमध्ये दरमहा 4 लाख 20 हजार रुपये भाडय़ाने राहणारे माजी मंत्री दीपक केसरकर राहत असलेल्या फ्लॅटमध्येही अतिक्रमण झालेले आहे.
आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिकेकडे तक्रार करून या प्रकरणाला वाचा पह्डली होती. त्यानंतर पालिकेने नोटीस बजावून व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाईचा बडगा उगारला आहे. 24 आणि 25 ऑगस्ट असे दोन दिवस तोडक कारवाई करण्यात आली. अजून चार-पाच दिवस ही कारवाई चालेल असे समजते.





























































