
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी राजीनामा दिला आहे. सिन्हा हे बिहार केडरचे आयएएस अधिकारी होते. त्यांना गेल्या वर्षीच फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्यापि स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान कार्यालयातील गेल्या काही महिन्यांतील हा दुसरा राजीनामा आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. सिन्हा यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. अमरजीत सिन्हा यांना भास्कर खुल्बे यांच्यासोबत सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तीन दशकांच्या सेवेत त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि पंचायत राजसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये महत्त्वाची पदे सांभाळली होती. दोन्ही रिटायर्ड अधिकारी होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा होता, मात्र सिन्हा यांनी मुदत संपण्याआधीच राजीनामा दिला आहे.
सिन्हा हे पीएमओमध्ये सामाजिक क्षेत्राशी संबंधित योजनांचे काम पाहत होते. ते 2019 मध्ये ग्रामीण विकास सचिव पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांना पीएमओमध्ये नियुक्त करण्यात आले होते.



























































