महिलांची सुरक्षा राखण्यास पेंद्र व राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना विभागीय नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा विमानतळासमोर मानवी साखळी करून निषेध आंदोलन करण्यात आले. मोदी यांनी विमानतळावर उतरून जळगाव गाठले. तत्पूर्वीच विमानतळाबाहेर हे धडक आंदोलन झाले. यावेळी दानवेंसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
हातात निषेधाचे फलक घेऊन काळे कपडे परिधान करून व डोक्याला काळय़ा फिती बांधून कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. चिकलठाणा विमानतळाशेजारील मातोश्री लॉन्स येथून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे शांततेच्या मार्गाने कूच केले. अनेकांच्या हातात बदलापूर, नाशिक, नालासोपारा येथील घटनेचा निषेध नोंदवणारे फलक होते. काळे कपडे परिधान करून आंदोलकांनी विमानतळाबाहेर आंदोलन केले.
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची काळजी आम्हाला आहेच, परंतु देशात व राज्यात मोठय़ा प्रमाणावर महिला अत्याचारांच्या घटना घडत आहेत. राज्यात नाशिक, अकोला, मुंबई, पुणे व बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार व हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही परिस्थिती बघता राज्य सरकार महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम नसल्याचे अधोरेखित होत असल्याने पंतप्रधान म्हणून राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेची हमी मागण्यासाठी हे निषेध आंदोलन केल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे, काँग्रेस शहराध्यक्ष शेख युसूफ, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ख्वाजा शरपद्दीन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य, किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.