हिंदुस्थान-अमेरिका नव्या पर्वाची सुरुवात, मोदी-बायडेन यांच्यात तासभर चर्चा

हिंदुस्थान-अमेरिकेमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. 40 लाख हिंदुस्थानी-अमेरिकन नागरिक अमेरिकेची ताकद आणखी मजबूत करण्यात योगदान देत आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या विकासातील हिंदुस्थानींचे भरीव योगदान मान्य केले. व्हाईट हाऊसमध्ये हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडेन यांच्यात जवळपास 57 मिनिटे चर्चा झाली. त्यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर भर देत विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. बैठकीला हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते.

मोदी म्हणाले…

  • हिंदुस्थान-अमेरिकेमध्ये व्यापार महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
  • हे दशक बुद्धिवंत लोकांमुळे आकार घेईल. अमेरिकेच्या प्रगतीमध्ये हिंदुस्थानी लोक सक्रिय योगदान देत आहेत याचा मला आनंद वाटतो.
  • हिंदुस्थान आणि अमेरिकेचे संबंध जगापुढील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतील.
  • हिंदुस्थान-अमेरिकेचे मैत्रीचे संबंध आणखी बळकट करण्यासाठी बीजे पेरली गेली आहेत.
    बायडेन म्हणाले…
  • मला दीर्घकाळापासून विश्वास आहे की, हिंदुस्थान-अमेरिकेचे संबंध अनेक वैश्विक आव्हानांचा सामना करण्यात मदत करू शकतील.
  • मी 2006 मध्येच म्हटले होते की, सन 2020 पर्यंत हिंदुस्थान आणि अमेरिका जगातील अत्यंत जवळचे मित्रराष्ट्र असतील.
  • कोरोना महामारी, वातावरण बदल तसेच इंडो-पॅसिफिक सुरक्षेसाठी आणखी काय करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे.

कमला यांना हिंदुस्थान भेटीचे निमंत्रण

मोदींनी गुरुवारी रात्री उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना हिंदुस्थान भेटीचे निमंत्रण दिले. मोदी आणि हॅरिस यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली. पाकिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहे. यादृष्टीने पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याच्या हिंदुस्थानच्या भूमिकेला हॅरिस यांनी सहमती दर्शवली. मोदींनी हॅरिस यांना भेटवस्तूही दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या