जुलैच्या ‘त्या’ सकाळी… एक बाळ हातात असताना मी दुसरं गमावलं

ब्रिटीश राजघराण्याच्या सूनबाई आणि प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल यांचा यावर्षी जुलै महिन्यात गर्भपात झाला. मेगन यांनी आपलं बाळ गमावलं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलेल्या ’द लॉसेस वुई शेअर’ लेखात मेगन यांनी गर्भपाताबद्दल माहिती दिली.

मेगन दुसऱयांदा गर्भवती होत्या. हॅरी आणि मेगन यांना पहिला मुलगा असून त्याचे नाव आर्ची आहे. आर्चीचे डायपर बदलत असताना एक जुलैच्या सकाळी ही घटना घडली असे मेगनने लिहिले आहे. माझं एक बाळ माझ्या हातात असताना मी दुसरं बाळ गमावलं. त्यानंतर काही तासांत मी हॉस्पिटलच्या बेडवर होते… पतीचा हात हातात होता, असे मेगनने सांगितले. मूल गमावण्याचं दुःख सहन न होण्यासारखं आहे. अनेकांनी हे अनुभवलंय. पण फार कमीजण त्याबद्दल बोलतात, असेही त्यांनी लेखात लिहिले आहे. दु:ख वाटल्यानेच ते कमी होतं. तू बरी आहेस ना? हा एक प्रश्न तुम्हाला बरे करू शकतो, असं त्या म्हणतात.

2018 साली अभिनेत्री मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. मेगन या राजघराण्याच्या सुनबाई असूनही त्यांनी वर्तमानपत्रातल्या लेखात गर्भपाताची माहिती देऊन ब्रिटीश राजघराण्याच्या पंरपरेला एक प्रकारे छेद दिला आहे. मेगन आणि हॅरी राजपरिवारासोबत राहत नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीला वास्तव्यासाठी ते अमेरिकेत गेले.

आपली प्रतिक्रिया द्या