
सामना ऑनलाईन | जयपूर
विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनात चपाती मागितली म्हणून त्यांना मुख्याध्यापकांनी “कोंबडा” बनवून बदडबदड बदडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील बांदीकुई गावातील राजकीय उच्च माध्यमिक शाळेत हा माणुसकीला काळिमा लावणारा प्रकार घडला. या प्रकारात ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानच्या बांदीकुई गावातील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात फक्त डाळ खायला देण्यात आली होती. फक्त डाळ कशी खायची? असा सवाल करीत विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे चपातीची मागणी केली. या मागणीने मुख्याध्यापक प्रचंड संतापले. त्यांनी विद्यार्थ्यांना ओणवे उभे करत दांड्याने बदडले. या विद्यार्थ्यांनी गावच्या सरपंचांकडे अपुऱ्या मध्यान्ह भोजनाची तक्रार केली होती. त्यामुळे मुख्याध्यापक कैलाश शर्मा प्रचंड संतापले होते. त्यांनी केलेल्या मारहाणीत ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी आणि शिक्षण सचिव नरेश पाल गंगवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत दौसाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याबाबतचा अहवाल मागवला आहे.



























































