पुढील तीन आठवडे रस्त्यांवरील खड्डे भरण्याला प्राथमिकता; महापालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई महानगरात एप्रिल 2021 पासून आतापर्यंत सर्व रस्त्यांवर मिळून 40 हजारपेक्षा जास्त खड्डे बुजविण्याची कामगिरी प्रशासनाने केली आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून सतत सुरु असलेला पाऊस आणि रस्त्यांवर वाढलेली वाहतूक यामुळे खड्डे निर्माण होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्याची कार्यवाही सर्व प्रशासकीय विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांनी संयुक्तपणे सुरु करावी. निदर्शनास आलेला खड्डा शक्यतो त्याच दिवशी भरण्यात यावा, खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी पुढील 2 ते 3 आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरातील रस्त्यांवर पावसाळ्यामुळे निर्माण झालेले खड्डे आणि पावसाळी साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजना या संदर्भात महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

मुंबई महानगरातील रस्त्यांवरील खड्डयांच्या समस्यांबाबत आयुक्त चहल यांनी मार्गदर्शन केले. दिनांक 9 एप्रिल 2021 ते आजपर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील रस्त्यांवर आढळलेले सुमारे 40 हजार खड्डे भरण्यात आले आहेत. असे असले तरी मुंबईतील यंदाचा पाऊस सुमारे 3 हजार मिलीमीटरपर्यंत पोहाचला असून मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु आहे. टाळेबंदी शिथील केल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक देखील वाढली आहे. असे असले तरी कोणतीही सबब पुढे न करता रस्त्यांवर निदर्शनास येणारे खड्डे बुजवून योग्यरित्या रस्ते परिरक्षीत करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे नमूद करुन चहल यांनी सविस्तर सूचना केल्या.

 • मुंबईतील सुमारे 147 किलोमीटर लांबीचे प्रकल्प रस्ते आणि दोष दायित्व कालावधीतील सुमारे 625 किलोमीटर रस्ते अशा एकूण 772 किलोमीटर रस्त्यांचे परिरक्षण योग्यरित्या होण्यासाठी संबंधित कंत्राटदार / मध्यवर्ती यंत्रणा यांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. या रस्त्यांवर खड्डे राहणार नाहीत, यासाठी तातडीने कार्यवाही करावी.
 • या व्यतिरिक्त राहिलेले म्हणजे सुमारे 1 हजार 087 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्तांनी युद्ध पातळीवर कार्यवाही हाती घ्यावी.
 • सर्व प्रशासकीय विभागातील रस्ते अभियंत्यांनी आपापल्या हद्दीतील प्रत्येक रस्त्यावर स्वतः प्रत्यक्ष फिरुन किती खड्डे आहेत, ते भरुन काढण्यासाठी किती साहित्य लागेल, याची माहिती संबंधित सहायक आयुक्तांना एका दिवसात सादर करावी.
 • सहायक आयुक्तांनी आवश्यक कोल्डमिक्सची मागणी तात्काळ रस्ते विभागाकडे नोंदवावी. मागणी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रशासकीय विभागांना ताबडतोब कोल्डमिक्स व इतर आवश्यक सर्व साधनसामुग्रीचा 2 दिवसांच्या आत पुरवठा करण्यात यावा.
 • रस्त्यांवर खड्डे निदर्शनास येताच ते भरुन काढण्याची कार्यवाही एका दिवसात पूर्ण झाली पाहिजे.
  सर्व सहायक आयुक्तांनी दररोज सकाळी आपापल्या प्रशासकीय विभागांमध्ये स्वतः फिरुन खड्डे भरण्याची कार्यवाही योग्यपणे होत असल्याची खातरजमा करावी.
 • सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त यांनी देखील खड्डे भरण्याच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे संबंधित सहायक आयुक्त, रस्ते अभियंते यांना मार्गदर्शन करावे. तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा.
 • एखाद्या समस्येवर मार्ग निघत नसेल तर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अथवा प्रमुख अभियंता (रस्ते) यांच्याशी थेट संपर्क करावा.
 • ज्या विभाग कार्यालयांमध्ये रस्ते विभागातील अभियंत्यांना इतर कामे / जबाबदारी सोपविली असतील, तर त्यांना इतर कामांमधून तत्काळ कार्यमुक्त करुन पुढील 1 महिनाभर फक्त रस्ते परिरक्षण विषयक जबाबदारीच प्राधान्याने देण्यात यावी.
 • वाहतूक पोलिसांनी निदर्शनास आणून दिलेल्या रस्त्यांवरील तसेच जास्त वर्दळींच्या रस्त्यांवरील खड्डे देखील प्राधान्याने भरावे, जेणेकरुन वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही.
 • शक्यतो रात्रीच्या वेळी खड्डे भरण्याची कार्यवाही करावी. म्हणजे वाहतुकीला अडथळा होणार नाही.
  सर्व कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल प्रमुख अभियंता (रस्ते) यांनी सादर करावा. तसेच समाज माध्यमांवर येणाऱ्या तक्रारींवर देखील कार्यवाही पूर्ण करुन योग्य प्रतिसाद द्यावा.
 • पुढील 2 ते 3 आठवड्यात या सविस्तर सुचनांचे दररोज तंतोतंत पालन करुन लक्षणीय आणि प्रभावी असा बदल प्रत्यक्षात आढळला पाहिजे. या सर्व कामकाजावर मी स्वतः दररोज लक्ष ठेवणार आहे, असे महानगरपालिका आयुक्त चहल यांनी नमूद केले.

रस्ते कामांच्या अनुषंगाने माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे भरताना त्यांचे योग्य मोजमाप करुन तातडीने भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती यंत्रणेकडे कोल्डमिक्सचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. काही विभागांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रस्ते अभियंत्यांवर कामकाजाचा अतिरिक्त ताण आहे. शिवाय इतर कामकाजही त्यांना देण्यात आले आहे. मात्र, आता पुढील 1 महिने रस्ते अभियंत्यांना इतर / अवांतर कोणतीही कामे न सोपवता प्राधान्याने रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याने त्यांना लक्ष केंद्रीत करता येईल, असे वेलरासू यांनी नमूद केले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी नमूद केले की, पुढील 2 ते 3 आठवडे जलद गतीने आणि चांगला समन्वय ठेवला तर खड्डयांविषयक समस्या निकाली काढता येईल. जास्त वर्दळीच्या रस्त्यांवर सातत्याने रस्ते अभियंता व सहायक आयुक्तांनी लक्ष ठेवावे, असे त्यांनी नमूद केले.

यानंतर पावसाळी साथ आजारांची सद्यस्थिती व करण्यात येत असलेल्या उपाययोजना याबाबतही आयुक्तांनी आढावा घेतला. त्या अनुषंगाने बोलताना आयुक्त चहल म्हणाले की, मागील सुमारे दीड वर्ष अथक प्रयत्न करुन आरोग्य यंत्रणेने कोविड विषाणूची साथ आता पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. तथापि, काही प्रमाणात पावसाळी साथ आजारांनी डोके वर काढल्याचे आढळते आहे. विशेषतः डेंग्यू आजाराबाबत अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ज्या-ज्या ठिकाणी डासांचे उत्पादन होण्याची शक्यता आहे, त्या सर्व ठिकाणी डास प्रतिबंधक व डास निर्मूलन उपाययोजनांना वेग द्यावा. ज्या प्रशासकीय विभाग किंवा परिसरांमध्ये जास्त रुग्ण आढळत असतील तिथे कार्यवाहीचा वेग वाढवावा, असे आयुक्त म्हणाले.

प्रशासकीय विभाग कार्यालयातील कीटक निर्मूलन अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आणि परिरक्षण अधिकारी यांनी संयुक्त कृती कार्यक्रम हाती घेऊन डास निर्मूलन करावे. आपापल्या भागांमधील अनुभवी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संस्था यांची देखील मदत घ्यावी, असेही निर्देश आयुक्त चहल यांनी दिले. तसेच सहायक आरोग्य अधिकारी (आरोग्य) यांनी दैनंदिन रुग्णांची आकडेवारी सहायक आयुक्तांना सादर करावी. सहायक आयुक्तांनी ज्या भागांमध्ये अधिक रुग्णसंख्या आढळत असेल, त्या भागांमध्ये आरोग्य उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी सुचनाही आयुक्त चहल यांनी अखेरीस केली.

दरम्यान, कीटक निर्मूलन अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देताना कीटकनाशक अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर म्हणाले की, डासांची उत्पत्ती होवू नये म्हणून जानेवारी 2021 पासून आतापर्यंत मुंबई महानगरात सुमारे 58 हजार ठिकाणी डास निर्मूलन उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या