स्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार

78

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये कैद्याने तुरुंगातून पळून जाण्यासाठी विचित्र मार्गाचा अवलंब केल्याने पोलिसही चक्रावून गेले. मात्र, पोलिसांनी अनेक हिकमतीनंतर त्याला अटक करून पुन्हा तुरुंगात डांबले. या कैद्याने तुरुंगातून पळून जाण्यासाठी स्वतःच्या अंगावर मलमूत्र लावून घेतले. त्यानंतर इतर कैद्यांवरही मलमूत्र फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर कैदी स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागले. त्या कैद्याच्या शरीराला दुर्गंध असल्याने पोलिसही त्याला रोखू शकले नाहीत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याने तुरुंगातून पलायन केले.

पश्चिम बंगालच्या तोपसिया पोलीस ठाण्यात ही विचित्र घटना घडली. मोहम्मद जब्बीरला बेकायदा शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत अटक करण्यात आली होती. त्याला तोपसियातील तुरुंगाच्या एका बराकीत ठेवण्यात आले होते. कैद्यांना बराकीतच प्रातर्विधीसाठी सोय केलेली असते. बराकीतील एका कोपऱ्यात झाकलेल्या शौचकूपात कैद्यांना प्रातर्विधी करावा लागतो. मात्र, सोमवारी जब्बीरने या शौचकूपाचा वापर न करता उघड्यावरच प्रातर्विधी केले. त्यानंतर तेथील मलमूत्र त्याने स्वतःच्या शरीराला फासले. बराकीतील इतर कैद्यांवरही तो मलमूत्र फेकू लागला. त्यामुळे इतर कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना बोलावले. इतर कैद्यांवर मलमूत्र फेकत तो अंमली पदार्थाची मागणी करत होता. बराकीत दुर्गंध परसल्याने कैद्यांना तिथे थांबणे कठीण झाले. दुर्गंधीमुळे जब्बीरला पकडण्याची हिंमत पोलिसही दाखवत नव्हते. पोलिसांनी जब्बीरला एका कोपऱ्यात बसण्याचे आदेश देत सफाई कर्मचाऱ्याला बोलावले. सफाई कर्मचारी आल्यावर ते स्वच्छतेसाठी जब्बीरकडे वळले. जब्बीरने परिस्थितीचा फायदा घेत सफाई कर्मचाऱ्याला धडक देत त्याला बाजूला फेकले आणि पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, दुर्गंधीमुळे त्याला कोणीही पकडले नाही. त्यामुळे तो तुरुंगाबाहेर पळण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली. ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवत त्याला सियालदाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्याकडून जब्बीरची सफाई करून त्याला पोलिसांनी पुन्हा तुरुंगात डांबले. या घटनेमुळे कैद्यांनी पळून जाण्यासाठी वेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत. त्यामुळे आता पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या