
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी प्रविण गायकवाड याला मंगळवारी रात्री त्रास होत असल्याने पोलीस बंदोबस्तात पारनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारानंतर त्याच्या हातात बेड्या घालत असताना कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देत आरोपीने पलायन केले. ही घटना मंगळवारी रात्री 8.45 वाजता घडली आहे.
याबाबतची तक्रार पोलीस सब इन्सपेक्टर विजयकुमार बोत्रे (वय 53,पारनेर पोलीस ठाणे, नगर) यांनी दिली असून आरोपी प्रवीण उर्फ मिठू पोपट गायकवाड (वय 26, रा.तराळवाडी, ता.पारनेर, जिल्हा नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सागर पाटील व विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार केल्याची माहिती देण्यात आली. मंगळवारी प्रवीण गायकवाडला लॉकअपमध्ये त्रास होऊ लागल्याने त्याला औषध उपचारासाठी पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्याला परत आणताना हातकडी लावत असताना त्याने पोलीस कॉन्सटेबलच्या हाताला झटका देत रुग्णालयातून पळून गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार बोत्रे करत आहेत.



























































