चार भिंतीत राहून 89 कैद्यांची शैक्षणिक भरारी, 80 जणांची पदवीला गवसणी

कळत नकळत गुन्हा केल्यामुळे शिक्षा झाल्यानंतर आरोपीला कारागृहात जावे लागते, पण त्या चार भिंतीत बंदिस्त झाल्यानंतरदेखील बरेच जण आपल्यातला चांगूलपणा सोडत नाहीत. अशा कैद्यांसाठी कारागृह प्रशासनदेखील विविध उपक्रम राबविते. याचाच 89 कैद्यांनी फायदा घेत चार भिंतीत राहूनदेखील शैक्षणिक भरारी घेतली आहे.

शिक्षा झाल्यामुळे आरोपीला कारागृहात जावे लागले तरी बरेच कैदी भविष्यात  चांगला नागरिक बनण्याची जिद्द सोडत नाहीत. झाले गेले विसरून एक जबाबदार नागरिक बनण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतात. अशा कैद्यांसाठी कारागृह प्रशासनदेखील विविध उपक्रम उपलब्ध करून देते. त्याचाच भाग म्हणून कैद्यांना शिक्षणाची दारेदेखील खुली करून दिली जातात. 2019 ते 2023 या पाच वर्षांत 89 कैद्यांनी चार भिंतीत राहून स्वतःची शैक्षणिक प्रगती करून घेतली. 80 कैद्यांनी कारागृहात राहून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली. एकाने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, तर दोघांनी दहावी-बारावीचे शिक्षण घेतले. शिवाय सहा कैद्यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.

नागपूर कारागृहातील कैदी हुशार

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील 30 कैद्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यापैकी 27 जणांनी पदवी, तर तिघा कैद्यांनी पदव्युत्तर शिक्षणाला गवसणी घातली. त्यापाठोपाठ अमरावती कारागृहातील 15 कैद्यांनी पदवी, तर एकाने दहावीचे शिक्षण पूर्ण केले.  कोल्हापूर कारागृहातील 14 कैद्यांनी पदवी, तर एकाने पदव्युत्तर शिक्षण घेतले. पैठण व नाशिक रोड कारागृहातील प्रत्येकी 9 कैद्यांनी पदवी पटकावली.

90 दिवसांची विशेष माफी मंजूर

राज्यातील 89 कैद्यांनी कारागृहात राहूनदेखील आपले शिक्षण पूर्ण केले. या कैद्यांची वर्तणूक चांगली होती. त्यामुळे याची दखल घेत या 89 कैद्यांना 90 दिवसांची विशेष माफीदेखील कारागृह विभागाच्या अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षकांनी मंजूर केली आहे. या माफीमुळे संबंधित कैद्यांची शिक्षा पूर्ण होण्यास 90 दिवस शिल्लक असताना त्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात येईल.