पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर कोरोना पसरवण्याच्या केलेला आरोप हे वैफल्य आणि नैराश्याचे लक्षण -पृथ्वीराज चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर कोरोना पसरवण्याच्या केलेल्या आरोपाचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य वैफल्य आणि नैराश्याचे लक्षण आहे. कोरोना सुरु झाला तेव्हा मजूरांना घरी जाण्यासाठी सेवाभावी संस्था आणि सरकारने मदत करण्याची भूमिका घेतली. कोरोनाला सुरवात झाल्यानंतर मोदी सरकारला मजूरांना घरी पोहचवण्यात अपयश आले. मजूर आपल्या मुलाबाळांना चालतच आपल्या घरी नेत असल्याचे जगाने पाहिले. त्यामुळे देशाची नाचक्की झाली. मजूरांनी घरी जाऊ नये, तिथेच रहावे असे त्यावेळी मत होते. ते अत्यंत क्रूरतेचे लक्षण होते. त्यामुळे पंतप्रधानांचे वक्तव्य चिड आणणारे असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

दारू आणि वाईन यामध्ये फरक आहे. विशेषतः लाल रंगाची वाईन ही शरीरासाठी उपयुक्त आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या निर्णयाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा याबाबत लोकांना अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले. किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्याबाबत यावर टीका करण्यापेक्षा जनतेला योग्य काय ते ठरवू द्या, असे त्यांनी म्हटले आहे.