पृथ्वी शॉ, मयांक अग्रवालला टीम इंडियामध्ये संधी मिळणार

48

सामना ऑनलाईन । मुंबई

शिखर धवन, मुरली विजय व लोकेश राहुल या तीन सलामीवीरांना इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या दोन कसोटींत सपाटून मार खावा लागलाय. याचा विपरीत परिणाम हिंदुस्थानी संघावर होताना दिसत आहे. त्याचमुळे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर असणाऱया टीम इंडियाच्या चमूत अखेरच्या दोन कसोटींसाठी आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ व स्थानिक मोसमात चमकदार कामगिरी करणारा मयांक अग्रवाल यांच्यासाठी हिंदुस्थानच्या कसोटी संघाचे दरवाजे उघडे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मुंबईकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी रेडी

मुंबई क्रिकेट संघाचा निवड समिती प्रमुख अजित आगरकर यावर म्हणाला, पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. मी त्याला खेळताना पाहिलेले नाही, पण त्याच्याबद्दल जेवढे ऐकले आहे त्यावरून पृथ्वी शॉला टीम इंडियात स्थान मिळायला हवे. मुंबईचा हा युवा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी रेडी झाला आहे, असे तो पुढे स्पष्ट म्हणाला.

– पृथ्वी शॉच्या बॅटमधून गेल्या दोन मोसमांत (स्थानिक व युवा आंतरराष्ट्रीय) धावांचा पाऊस पडलाय. त्याने 14 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 56.72च्या सरासरीने 1418 धावा फटकावल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या