
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ याने रणजी करंडकात वादळी खेळी केली आहे. चंदीगडविरुद्ध पृथ्वी शॉ याने 140 च्या स्ट्राईक रेटने खेळताना द्विशतक ठोकले. पहिल्या डावामध्ये झटपट बाद झालेल्या पृथ्वीने दुसऱ्या डावात 156 चेंडूत 222 धावा चोपल्या. 29 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने त्याने ही खेळी सजवली. पृथ्वीच्या या खेळीमुळे महाराष्ट्राने 3 बाद 359 धावांवर डाव घोषित केला आणि पहिल्या डावात 104 धावांच्या आघाडीच्या बळावर चंदीगडपुढे 464 धावांचे आव्हान ठेवले.
महाराष्ट्राने पहिल्या डावात 313 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर चंदीडगचा डाव 209 धावांमध्ये गुंडाळत 104 धावांची आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ याने टी-20 स्टाईल फटकेबाजी करत अवघ्या 72 चेंडूत शतकाला गवसणी घातली. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासातील हे सहावे सर्वात जलद शतक ठरले.
पृथ्वी शॉ व्यतिरिक्त अर्शिन कुलकर्णी याने याने 31, सिद्धेश वीर याने 62 आणि ऋतुराज गायकवाड याने नाबाद 36 धावांचे योगदान दिले.


























































