
काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित सोहळय़ात भाजपमध्ये प्रवेश केला. वास्तविक शासकीय अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठका आणि शासकीय कार्यक्रम घेण्याबाबतचे शासकीय परिपत्रक आहे, पण सर्व नियमांना बगल देत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
सह्याद्री अतिथीगृहावर काही वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या पत्नीने सह्याद्री अतिथीगृहावर पाककृती स्पर्धा आयोजित केली होती. सनदी अधिकाऱ्यांच्या पत्नींची संघटना असलेल्या ‘आयएएस ऑफिसर्स व्हाईफ असोसिएशनने’ हे अतिथीगृह आरक्षित केले होते. त्यानंतर मोठी खळबळ माजली होती. सह्याद्री अतिथीगृहात फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, तसेच सचिव अथवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका, कार्यशाळा, पत्रकार परिषदा आयोजित करण्यात याव्यात असे आदेश 20 जुलै 2015 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार जारी करण्यात आले आहे. दरम्यान पृथ्वीराज पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर भाजपमध्ये प्रवेश झाल्याचे भाजप प्रदेश कार्यालयाने माध्यमांना पाठवलेल्या ‘प्रेस नोट’मध्येच म्हटले आहे.