
प्रिया भोसले
भारतीय प्रेक्षकांची नस ओळखून नीतिमत्तेच्या वेष्टणात सजवलेले अभिनेते रूपेरी पडद्यावर पेश करणं सिनेसृष्टी निर्माण झाल्यापासून चालत आलं आहे. भावनेला महत्त्व देणाऱ्या प्रेक्षकाचा न्यायाची चाड असणारा हिरो तर आदर्शच म्हणावा असा. गुंडांशी दोन हात करुन, परिस्थितीचा ताबा घेऊन आणि ‘ते सुखाने नांदले’ उक्तीला पडद्यावर पाहणं म्हणजे दोन घटका मनोरंजन! अशा अपेक्षित कोंदणात धर्मेंद्र परफेक्ट बसला. जगातल्या देखण्या पुरुषांच्या यादीत त्याचं नाव आलं.गरीबोंका रखवाला म्हणून त्याची प्रतिमा लोकांच्या मनावर प्रभावीपणे ठसली.”कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाऊंगा” वाक्याला फिल्मी इतिहासात मानाचं स्थान मिळवून दिलं.
बलदंड शरीरयष्टी आणि चेहरयावरचा निरागसपणा असं अफलातून डेडली मिश्रण असणारा हिंदी चित्रपट सृष्टीचा एकमेव हिमॅन … धर्मेंद्र! त्याच्यासारखा नट चित्रपटसृष्टीला लाभला हे चित्रपटसृष्टीचं भाग्यच म्हणावं लागेल.कारण मारधाडीला धर्मेंद्रने ग्लॅमर मिळवून दिलं.त्याच्या येण्याच्या आधी लुटुपुटूची वाटणारी फायटिंग तो आल्यानंतर खरीखुरी, जिवंत वाटू लागली.त्याच्या समकालीन अभिनेत्यांचा अॅक्शन चित्रपटांमध्ये फारसा रस नव्हता, किंबहुना त्या क्रायटेरियात बसेल असा कुणी नव्हताच.कुणाकडे देखणेपण होतं पण त्याला अॅक्शन शोभत नव्हती. अॅक्शनला शोभेल अशी देहयष्टी होती पण देखणेपण नव्हतं. अभिनय चांगला होता मात्र पण फायटींगमधे रस नव्हता, अशी सगळी गडबड ज्या काळात होती त्या काळात धर्मेंद्र उदयाला आला. अभिनेत्यांच्या मांदियाळीत धर्मेंद्रने पार्ट टाईम अॅक्शन हिरो संकल्पना मोडीत काढून अॅक्शन चित्रपटांचा मार्ग मोकळा करुन दिला.
तो आला तेव्हा रोमँटिक आणि कौटुंबिक चित्रपटांची चलती होती. स्थिरस्थावर होण्याआधी त्यालाही बंदिनी, अनपढ,देवर,काजल,अनुपमा, ममता सारख्या स्त्रीप्रधान सिनेमांचा आधार घ्यावा लागला होता.नंतर देखणेपणाच्या जीवावर रोमँटिक चित्रपटही केले पण आराधनानंतर राजेश खन्नाने सारया रोमँटिक हिरोंचं मार्केट डाऊन केलं तसा तो काळाची पावलं ओळखून अॅक्शन चित्रपटाकडे वळला.तसंही हा पंजाबी जाट, रोमँटीक गोडगुलाबी धाटणीच्या चित्रपटांसाठी बनला नव्हताच. काका आला नसता तर धर्मेंद्र अॅक्शन चित्रपटाकडे वळला असता का ? असले घाबरवणारे प्रश्न विचारायचेच कशाला. देवाची कृपा काय ती हीच म्हणायचं आणि त्याचा एखादा सदाबहार सिनेमा पहायचा.
सत्तरच्या दशकात जगातील देखण्या पुरूषांच्या यादीत त्याचं नावं आलं आणि त्याच्या देखणेपणावर ऑफिशियली शिक्कामोर्तब झालं. हॉलीवूड- बॉलीवूडच्या (शालीमार) आणि इंडियन सोव्हिएट को प्रोडक्शन ( अलिबाबा चालीस चोर) चित्रपटांची तो पहिली पसंती होता ह्यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते.
फक्त देखणा नट इतपत मर्यादीत न राहता तो सिनेमात पूर्ण पॅकेज बनून समोर यायचा.जितक्या त्वेषाने तो गुंडांना मारायचा तितकाच रोमँटिक दृष्यात तो हळवा वाटायचा.त्याचा कॉमेडी सेन्स अफलातून होता, भावूक प्रसंगांमध्ये तो घळघळा रडू शकायचा. सीता और गीता, ब्लॅकमेल मध्ये त्याचं लाजणंही बघा. स्त्रीने प्रेमाचं आव्हान द्यावं आणि पुरुषाने लाजावं हे वाचताना जरी वेगळं वाटलं तरी पडद्यावर ही किमया करणारा तो एकमेव अॅक्शन हिरो होता. लाजणं,रडणं ही त्याला कसलं शोभायचं.
मित्राच्या सांगण्यावरून राखीला भेटायला आलेला, तिच्या प्रश्नांनी घाबरुन अशक्य गोड दिसणारा ब्लॅकमेलमधला धर्मेंद्र आठवतोय?
एकाचवेळी शत्रुघ्न सिन्हाला कुत्ते कमीने मै तेरा खुन पी जाऊँगा म्हणत राखीसोबत पल पल दिल के पास गाताना नाकपुडी फुगवत, मोहक दिसत कहर कसा करायचं ते तोच जाणे.
शत्रुचा खलनायक प्रभावी वाटू शकला कारण धर्मेंद्रसारख्या चांगल्या माणसाला त्रास देणं लोकांना १००% पटण्यासारखं होतं.त्यात इफ्तेखार म्हणतोच कि,त्याच्यासारखा शानदार माणूस कुणी नाही.
सिनेमातली शशी कपूर,सुनील दत्त आणि धर्मेंद्र ही मंडळी कायमच चांगली वाटत आली आहेत.त्यांनी कधी खलनायक साकारला असता तर लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास उडाला असता इतका त्यांचा चांगुलपणा वाटायचा. हे नट आणि चांगूलपणा ही प्रेक्षकांना काळ्या दगडावरची रेघ वाटायची. धरमपाजी तर ह्या कम्युनिटीचा म्होरक्याच.
यादों की बारात, धरम वीर,मेरा गाँव मेरा देश,चरस,जुगनू,लोफर,राम बलराम,सीता और गीता,अलिबाबा 40 चोर, शोले, प्रतिज्ञा सारखे मारधाड चित्रपट असो किंवा चुपके चुपकेतली विनोदी भुमिका असो…सबकुछ धरमवाला मामला असायचा.
शोलेत त्याची आणि अमिताभची केमिस्ट्री बघा,त्याची आणि हेमाची केमिस्ट्री बघा. तो सहजगत्या जिगरा वाटायचा.पाण्याच्या टाकीवरचा धरमचा सीन बघण्यात लोकं इतके गुंतले की ज्या गावात लाईट नाही, पाण्यासाठी विहिरीवर जावं लागतं अशा रामगढमधे पाण्याची टाकी असेलच कशी असा प्रश्न लोकांना पडण्याऐवजी “जेल में चक्की पिसिंग अँड पिसींग” सारखा डायलॉग फेमस झाला ह्यात सिप्पींच्या दिग्दर्शनासोबत धर्मेंद्रच्या अभिनयाच्या जादूचाही फार मोठा वाटा आहे.
शोलेनंतर तो प्रतिज्ञात ही सुसाट सुटलाय. कॉमेडीचं अचूक टायमिंग,त्याच राग, संताप, हेमामालीनीवरचं रांगडे प्रेम,मै जट यमला पगला दिवाना गाण्यात त्याने घातलेला धुडगुस..काय नव्हतं त्याच्याकडे.नाचाचं अंग नव्हतं म्हणावं तर त्याच्या नाचण्याची खास स्टाईल ही अजरामर झाली. अंगभूत कलागुण तर प्रसिद्ध होतातच पण नसलेल्या कौशल्यालाही प्रसिद्ध करणारा कुणी असेल तर तो फक्त धर्मेंद्रच!
अॅक्शन हिरोचा टॅग लागल्यामुळे अमिताभसारखा त्याच्या अभिनयाचा कधी बोलबाला झाला नाही.ती कसर त्याने त्याच्या सत्यकाम,दिल्लगीतून भरुन काढली.दिल्लगीत जाड भिंगाच्या चष्म्यात,सदरा लेंग्यात,पर्सनॅलिटीला न शोभणारं कसलं ते पुचाट स्वर्णकमलबाबू नाव घेऊन हि काय भन्नाट वावरलाय.खत्रुड हेमाला हाच माणसात आणू शकतो,इतका आत्मविश्वास चेहराभर लेऊन तो पिक्चरभर दिसतो. ज्यांना त्याच्यात फक्त गरम धरम दिसला त्यांनी सत्यकाम बघावा. सत्याची बाजू घेणारा परफेक्ट न्याय देणारा हिरो हृषिकेश मुखर्जींना तसाही आयताच मिळाला होता.
धर्मेंद्रच्या अभिनयाइतकं त्याला मिळालेली गाणी हा स्वतंत्र विषय होऊ शकतो.त्याच्या हसीन चेहऱ्याला शोभणारी फार सुंदर गाणी मिळाली होती.पल पल दिल के पास असो किंवा ओ मेरी मेहबूबा असो.गाणं ऐकताना हिरोईन इतकाच तो ही नजरेसमोर येतो.
शालिमारमधलं ‘हम बेवफा’ पाहीलयं..कामाचा भाग म्हणुन प्रेयसीला दुखावल्याचा दर्द त्याच्या डोळ्यांत उतरलेला बघावा.चेहराभर पसरलेली वेदना त्याच्या मर्दाना रांगडेपणाला शोभत दु:ख भरजरी करुन टाकते.कुछ मर्द ,दर्द को भी खुबसूरत करते है ते फक्त धर्मेंद्रकडे बघून पटतं.
इतका चित्रपटांच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न कलाकार पण त्याची पुरस्कारासोबत कधी नाळ जुळलीच नाही.एकच लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन इंडस्ट्रीने फार मोठा अन्याय केला. निदान सत्यकामसाठी तरी मिळायला हवा होता असं मनापासून वाटतंच. पण काही लोकं पुरस्कार मॅनेज करतात तशी ह्याने लोकप्रियता मॅनेज केली. गुड्डीतलं उत्पल दत्तच्या, मुली तुमच्यावर फिदा आहेत वाक्यावर “मै तो आजकल राजेश खन्ना का नाम सुन रहा हूं” म्हणत,राजेश खन्नाचं महत्त्व सहजपणे स्वीकारणारा धरम मधला चांगला माणूस लोकांच्या मनापर्यंत उगाच पोचला नाहीये.
त्याला पुरस्काराने बरयाचदा हुलकावणी दिली पण लोकप्रियता मात्र अबाधित राहीली.इतकी कि रॉकी और रानी की प्रेम कहानीमधे त्याची लोकप्रियता कॅश करण्याचा मोह खुद्द करन जोहरलाही आवरता आला नाही.ह्या वयातही शबानासोबतच्या चुंबनदृष्याची हवा झाली.
आजच्या काळात प्रगत तंत्रज्ञानाची पुण्याई पाठीशी असलेले मार्वेलचे सुपरहिरो पाहिले की आपला हा त्याकाळातला ही-मॅन आठवतो. आज प्रगत तंत्रज्ञानासोबत कॅरेक्टर डिझाईनिंगचं महत्त्व अधोरेखित करणारा सिनेमा खूप पुढे गेलाय.पण तेव्हा साध्या फायटींगसाठी ढिशुम ढिशुम साऊंडला मानवी आवाज लागणारी सिनेसृष्टी भले तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हती पण अभिनयातून पोचवणारे काही धर्मेंद्रसारखे कुशल नट होते म्हणून रूपेरी पडद्यावर ते सगळं खरखुरं ,जिवंत वाटायचं.
लुटूपुटूची मारधाड खरी वाटायला लावणारा त्या काळातला धर्मेंद्र नावाचा सुपरहिरो आज 88 वयात पदार्पण करतोय.काळ बदलतो, हिरो, सुपरहिरो म्हातारे होतात तसा तो ही म्हातारा झालाय पण त्याच्या चित्रपटाने सजलेला काळ आठवणींच्या राज्यात अजूनही तरुण आहे आणि त्याला उद्देशून म्हणावसं वाटणारं त्याचं गाणंही….
“पल पल दिल के पास तुम रहते हो!
(लेखिका या चित्रपट समीक्षक आहेत)





























































