प्रिया वर्मा यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल

742

रविवारी राजगडमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ भाजपने काढलेल्या तिरंगा यात्रेत भाजप कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात धुमश्चक्री झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं होतं. या प्रकरणी दोन भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्हा मुख्यालयावर सीएए समर्थन कार्यक्रमाचे आयोजन भाजपने केले होते. यामुळे प्रशासनाने या परिसरात कलम-144 जमावबंदीचा आदेश लागू केला होता. प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही भाजपने हे आंदोलन केले. राजगडच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आणि पोलीस अधीक्षकांनी भाजप कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

या वेळी शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्यानंतर संतापलेल्या राजगडच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांनी एका भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली. यानंतर आक्रमक झालेल्या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, जमावाला हिंसक आंदोलन करण्यास भाग पाडणाऱ्या भाजपच्या एका माजी आमदाराविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनाही जमावाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. प्रिया वर्मा यांनीही गर्दीत घुसून आंदोलनकर्त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केली.

भाजप कार्यकर्त्यांनी या वेळी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात धक्काबुक्की झाली. यातच महिला अधिकाऱ्यांसोबत अश्लील भाषा आणि त्यांचे कपडे फाडल्याची घटना घडली. त्यामुळे संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात दोन कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी 8 ते 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या