काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील इंडिया आघाडीच्या जोरदार कामगिरीबद्दल अखिलेश यादव यांच्यासह समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवली आणि लोकशाहीचे संरक्षण केले, असे प्रियांका यांनी एक्स वरील एका संदेशात म्हटले आहे. प्रियांका गांधी यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि सपा राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांचे अभिनंदन केले. उत्तर प्रदेशातील निकालासाठी परिश्रम करणाऱया सपाच्या कार्यकर्त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.आपण सर्वांनी मिळून कठीण परिस्थितीत एक ऐतिहासिक लढा दिला. काँग्रेस आणि सपाच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि संविधानासाठी धैर्याने आवाज उठवला, असे प्रियांका यांनी म्हटले आहे.