देशात हिंसाचार, सूडाच्या राजकारणाला जागा नाही! प्रियंका गांधींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

573

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून उत्तर प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी लखनौ येथील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हिंसाचार आणि सूड उगवणे ही या देशाची परंपरा नाही असे चोख प्रत्युत्तर त्यांनी आदित्यनाथ यांना दिले.

उत्तर प्रदेशमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रियंका यांनी चार दिवस लखनौचा दौरा केला. सोमवारी दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी योगी आदित्यनाथ यांना टीकेचे लक्ष्य केले. योगी म्हणतात की मी जनतेचा बदला घेईन. देशात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी असे धक्कादायक विधान केले आहे. उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारनेच पोलिसांच्या माध्यमातून राज्यात अराजकता पसवण्याचे काम केले आहे असा आरोप प्रियंका यांनी या वेळी केला. यासंदर्भात आम्ही राज्यपालांना एक निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

माझी सुरक्षा हा चघळत बसण्याचा मुद्दा नाही

हेल्मेट परिधान न केलेल्या आमदाराच्या दुचाकीवर बसून प्रियंका रविवारी निवृत्त पोलीस अधिकार्‍याच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्या होत्या. त्यावरून त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावर माझी सुरक्षा हा चघळत बसण्याचा मुद्दा नाही. त्याऐवजी उत्तर प्रदेशातील सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला प्रियंका यांनी आदित्यनाथ यांना दिला. दरम्यान, प्रियंका यांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय न केल्याचे सीआरपीएफने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या