काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे इंडिया गेटजवळ धरणे आंदोलन

500

हैदराबादमध्ये डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. महिलांची सुरक्षितता आणि जामिया विद्यापीठाबाहेर झालेला हिंसाचार या मुद्द्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी राजधानी दिल्लीतील इंडिया गेटजवळ धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेतेही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

जामिया हिंसाचारामध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण करत अश्रूधराचा वापर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ प्रियंका गांधी यांनी इंडिया गेटजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे. आपला देश ही गुंडाची जहागिरी नाही, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. मारहाण झालेल्या जामियाच्या विद्यार्थ्यांच्या मागे आम्ही उभे आहोत, हा या आंदोलनाचा हेतू असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. हे आंदोलन दोन तास करण्यात येणार आहे. नागरिकता कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बलाचा प्रयोग करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या धरणे आंदोलनात प्रियंका गांधी यांच्यासोबत के.सी. वेणूगोपाल, माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी, अहमद पटेल आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या