तुझी बहीण असल्याचा अभिमान आहे… भावासाठी प्रियांका गांधी यांनी शेअर केली भावूक पोस्ट

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीने चांगली कामगिरी केल्याचा आनंद व्यक्त करत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपला भाऊ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक करत पाठ थोपटली आहे. त्यांनी राहुल गांधी यांची मेहनत आणि संघर्ष कौतुकास्पद असल्याचे म्हणत सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुझी बहीण असल्याचा गर्व आहे, असे म्हणत प्रियांका यांनी राहुल गांधी यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ‘इंडिया’ आघाडीने जबरदस्त कामगिरी केली. काँग्रेस पक्षाने 99 जागांवर विजयाची मोहोर उमटवली. मागच्या वेळेस हा आकडा 52 होता. यावेळी काँग्रेसने ‘इंडिया’ आघाडी बनवली होती. यात आघाडीला प्रचंड यश मिळाले. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर आपला भाऊ, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी खास पोस्ट लिहीली. ”तुमच्या दृढनिश्चयावर विरोधकांनी तुमच्या विरोधात खोटा प्रचार केला. मात्र तरीही कधी झुकला नाहीत आणि सच्चेपणासाठी लढत राहिलात”, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी प्रेम, सच्चेपणा आणि दयाळूपणे द्वेषाविरोधात ही लढाई लढली आहे असे सांगत ”माझ्या भावाचा मला अभिमान आहे”, असे त्या म्हणाल्या.

हे लिहीताना प्रियांका गांधी यांनी एक सल्लाही दिला. ”तुम्ही तुमच्या लक्ष्यावर ठाम राहा, ज्या लोकांनी तुमच्यावर टीका केली त्याची पर्वा तुम्ही केली नाहीत…किती आव्हाने आली, पण तुम्ही झुकला नाहीत. तुमच्या दृढ निश्चयावर अनेकांनी शंका उपस्थित केली पण तुम्ही कुठेही खचला नाहीत. तुमच्याविरोधात खोटा प्रचार करण्यात आला, मात्र सत्याच्या बाजूने लढण्यासाठी तुम्ही मागे हटला नाहीत. त्यांचा राग न करता संयम दाखवला”, असे त्यांनी लिहिले. ”तुम्ही तुमच्या हृदयात प्रेम, सच्चेपणा आणि दयाळूपणा दाखवून संघर्ष केला. ज्या लोकांना तुमच्यातला चांगूलपणा दिसला नाही. ते आता बघत आहेत. मात्र आम्ही सर्व तो चांगुलपणा कायम पाहत आलो आहेत. मला तुझी बहीण असल्याचा अभिमान आहे, अशी भावूक पोस्ट शेअर करत प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची पाठ थोपटली आहे.