कलम 370 हटवणं हे राष्ट्रविरोधी कृत्य, प्रियंका गांधी यांची टीका

697

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निषेध केला आहे. जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकणं हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याची टीका गांधी यांनी केली आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रियंका यांनी ट्वीट करून ही टीका केली आहे. कश्मीरमध्ये लोकशाहीच्या अधिकारांना संपवण्याहून अधिक राजकीय आणि राष्ट्रविरोधी कृत्य असू शकत नाही. या कृत्याविरोधात आवाज उठवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

जम्मू-कश्मीरला निघालेल्या राहुल गांधी आणि विरोधी पक्षातल्या तमाम नेत्यांना विमानतळाहून परत पाठवण्यात आलं. ज्यावेळी राहुल विमानाने कश्मीरला जात होते, तेव्हा विमानातील काहींनी त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यात एक महिला आणि राहुल गांधी यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा संदर्भ देऊन प्रियंका म्हणाल्या की, हे असं किती दिवस सुरू राहणार? या आपल्यासारख्या लाखों लोकांप्रमाणे आहेत, ज्यांना गप्प बसवलं जात आहे आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली चिरडलं जात आहे, असंही गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या