‘पाकनिर्णय’चा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय’तर्फे ‘पाकनिर्णय 2024’ ही पाककला स्पर्धा तसेच ‘लघु लघुकथा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम 19 ऑक्टोबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात सायंकाळी 5.30 वाजता होईल. यावेळी ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी 2024’चे प्रकाशनही होणार आहे.

कार्यक्रमात जीवनगाणी निर्मित ‘स्वरांच्या हिंदोळ्यावर’ ही मराठी भावगीतांचा मैफल सादर होईल. यामध्ये गायक मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे सहभागी होतील तर कुणाल रेगे कार्यक्रमाचे निवेदन करतील. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह अनेक मान्यवर तसेच पाककला स्पर्धेचे परीक्षक उपस्थित राहतील. याविषयी कालनिर्णयचे संस्थापक, प्रकाशक आणि संपादक जयराज साळगावकर म्हणाले, ‘कालनिर्णयच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना वाचक, लेखक आणि कलाकारांचे प्रेम आणि आधार किती महत्त्वाचा होता आणि आहे हे लक्षात येते. या सोहळ्यानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करता येतो.