कोरोनावरील लस आल्यानंतरच कबड्डीचा दम घुमणार… प्रो कबड्डी स्टार विशाल मानेचे उद्गार

377

कबड्डी हा महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ. पण कबड्डी हा सांघिक व बॉडी कॉण्टॅक्ट खेळ असल्यामुळे सध्या तरी या खेळातील खेळाडूंचे नुकसान होत आहे. कोरोनामुळे सध्या क्रीडाविश्वही ठप्प झाले आहे.

हिंदुस्थानात खेळाडूंच्या सरावाला परवानगी देण्यात आली असली तरी खेळाडूंसाठी पूर्णपणे दरवाजे अद्याप उघडण्यात आलेले नाही. कबड्डी व कबड्डीपटूंचीही तीच अवस्था आहे. प्रो कबड्डी स्पर्धा ही युवा खेळाडूंना आपली चमक दाखवण्यासाठी भक्कम व्यासपीठ मिळवून देते. मात्र कोरोनामुळे ही स्पर्धाही लांबणीवर गेली आहे. अशा परिस्थितीत मागच्या मोसमात दिल्लीकडून खेळणारा पण अस्सल मुंबईकर असलेल्या विशाल माने याच्याशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला असता तो म्हणाला, कोरोना वाढतच चालला आहे. त्यामुळे जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत कबड्डीचा दम केव्हा घुमेल याबाबत सांगणे कठीण आहे.

घरी जिमचे साहित्य नसलेल्यांचे हाल
कोरोनामुळे कबड्डीचेच नव्हे तर इतर खेळांतील खेळाडूंचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे सर्व काही बंद असल्यामुळे खेळाडूंना घरच्या घरी फिटनेससाठी व्यायाम करावा लागत आहे. माझ्या घरी डम्बेल्स असल्यामुळे मी फिटनेसवर मेहनत घेत आहे. मात्र गरीब व होतकरू खेळाडू ज्यांच्या घरी जिमचे साहित्य नाहीत, अशा खेळाडूंचे हाल झाले आहेत, असे विशाल माने यावेळी म्हणाला.

युवा खेळाडूंनी संयम राखायला हवा
कबड्डी खेळामध्ये करिअर करू इच्छिणाऱयांसाठी एकच सांगेन, निराश होऊ नका. संयम राखा. सर्व काही व्यवस्थित होईल. आता जगलो, तर शून्यातून विश्व निर्माण करता येईल. कोरोनामुळे घरी रहावे लागत आहे. त्याचा सदुपयोग करा. ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होतेय. त्याकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा. कबड्डीच्या जुन्या लढती बघा, असा सल्ला विशाल माने याने युवा कबड्डीपटूंना दिला.

त्याबाबतीत समाधानी
कोरोनामुळे जगावरच संकट कोसळले आहे. कित्येकांच्या नोकऱया गेल्या. पगार कपात करण्यात आली. दिवसावर काम करणाऱया मजुरांचे तर पुरते हाल झालेत. अशा परिस्थितीत माझ्याकडे बघितल्यानंतर असे वाटते खरचं मी नशीबवान आहे, कारण मी ज्या कंपनीत काम करतोय तिथे अशा कोणत्याही गोष्टी घडत नाहीए. मी भारत पेट्रोलियमचे प्रतिनिधीत्व करतो. एवढेच नव्हे तर माझ्यासोबत या संघात रिशांक देवाडिगा, नितीन मोरे, नीलेश शिंदे, नितीन मदने, गिरीश इरनाक, रोहीत राणा या स्टार खेळाडूंचाही समावेश आहे. आम्हाला कंपनीकडून पगारासह सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत, असे विशाल माने यावेळी आवर्जून म्हणाला

आपली प्रतिक्रिया द्या