दखल –  नव्या पिढीचे कथाबीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा.सुहास द. बारटक्के

मराठी साहित्य विश्वात डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या कादंबऱयांनी समीक्षक, वाचक व लेखकांची मोठी दाद मिळवली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी आपल्या कादंबऱयांसाठी वापरलेला चाकोरीबाह्य आकृतिबंध. त्यातील एक प्रयोग म्हणजे ‘काळमेकर लाइव्ह’ ही कादंबरी होय. प्रत्येक व्यक्तीच्या हातातील मोबाइल, त्यामधील अॅप्स, टी.व्ही. व त्यामधील बातम्या, एखाद्या गोष्टीचे लाइव्ह वर्णन आणि त्यामागची सत्यासत्यता, ऑनलाइन, ऑफलाइन सतत येणारी माहिती आणि त्यामुळे अस्वस्थ व बेचैन होणारी आजची पिढी या सर्वांचा यथायोग्य वापर करून परखड भाषेत त्यांनी लिहिलेली ‘काळमेकर लाइव्ह’ ही त्यांची नवी कादंबरी करते.

‘काळमेकर’मधील ‘काळ’ हा विविध रूपांत आपल्यासमोर उभा ठाकतो. भूतकाळातील संदर्भ, वर्तमानकाळातील जीवनात झालेले बदल वेगवेगळ्या रूपात आपल्या समोर येतात. काही गूढ, अगम्य प्रसंग आपल्याला थेट त्या काळात ओढून नेतात. स्तिमित होऊन वाचताना वाचक त्या कादंबरीत ‘मी’ म्हणून केव्हा भूमिका स्वीकारतो त्याचे त्यालाच कळत नाही. जागोजागी होणारे संवाद आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे भान देतात, तर काहीशी मुक्तकाव्यात्मक असलेली ‘म्हाताऱयाची’ स्वगत भाषणेही वाचकाला अस्वस्थ करून विचार करायला भाग पाडतात. वाचक हे वाचत असताना स्वतच काळमेकरच्या हातातील बाहुले बनतो, परंतु तरीही आपण ‘लाइव्ह!’ आहोत याचा आनंद घेत म्हाताऱयाचे ‘लाइव्ह’ वाचत पुढे जातात. अशी कथेत कथा तो वाचणारा वाचक यांचे नाते तयार होते. त्यामुळे ही उत्तर आधुनिक प्रभावी कादंबरी आहे.

‘कोरोना’ काळात लोकांची झालेली परवड या कादंबरीत ठळकपणे येते. कोरोनात केवळ जीवनशैलीच नव्हे, तर कोरोना काळात मोलमजुरी करणाऱयांचे झालेले हाल हे भयकारी वास्तव आपल्या अंगावर येत राहते. अंतर्गत जातीय राजकारण, आंतरराष्ट्रीय ‘व्हायरस’ प्रकरण, सरकारी व खासगी बाबूंचे वस्त्रहरण, भक्ती, प्रेम असे अनेक विषय त्यात हाताळण्यात आले आहेत. यातील दृश्यरूपी कथा वाचताना वाचक सुन्न होऊन विविध घटनांचा ‘कोलाज’ पुन: पुन्हा आठवत राहतो. अशी ही मराठीला भन्नाट, नव्या फार्मची उत्तर आधुनिक, वैश्विक नवकादंबरी लाभली आहे हे लक्षणीय आहे.