
महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून आज झालेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांच्या तक्रारीमुळे प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाली. ड्रेनेज, पाइपलाइन, गार्डन, अतिक्रमण आणि स्वच्छतेच्या त्याच-त्याच समस्यांच्या अर्जांनी ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पहिल्या दोन तासांतच 134 जणांनी तक्रार नोंदवली. तक्रारींचा ओघ पाहता रात्री उशिरापर्यंत हा जनता दरबार सुरू ठेवण्याची चिन्हे दिसू लागल्याने तक्रारी अर्ज घेणे बंद करण्यात आले. तरीसुद्धा काही नागरिक तक्रार अर्ज घेऊन येऊ लागल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत जागेवरच संबंधित अधिकाऱयांकडून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न यावेळी दिसून आला. प्रशासनाच्या मदतीने जनतेचे प्रश्न 15 दिवसांत मार्गी लावू, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली.
सकाळी अकरा पासूनच महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात या जनता दरबारास सुरुवात झाली. नागरी समस्या घेऊन येणाऱया नागरिकांना नंबरप्रमाणे त्यांची तक्रार मांडण्यास प्राधान्य देण्यात आले. वारंवार सांगूनही विद्युत विभागाकडून लाईट लावलेली नाही. पार्ंकगच्या जागेतील गाळ्यात हॉटेल व्यवसाय, रहदारीच्या ठिकाणी जीवघेणे खड्डे, पर्यायी जागा देण्यावरून झालेली फसवणूक, खुल्या जागेवर बांधकाम व्यावसायिकाने केलेले अतिक्रमण, पाण्याच्या पाइपलाइनमधील भ्रष्टाचार, भाजी मंडई, स्वच्छतागृह, महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था, कचरा तसेच लघुउद्योग पांजरपोळ असोसिएशनच्या वतीने भाडेपट्टी कमी करण्याची विनंती, तसेच खोटे प्रमाणपत्र यासह अन्य प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर महापौरांनी प्रत्येकाला समाधानकारक उत्तर देत प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. पुढच्या जनता दरबारपर्यंत तुम्हा सर्वांचे प्रश्न सुटलेले असतील, अशी ग्वाही दिली.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेते मुरलीधर जाधव, राहुल चिकोडे, विजयसिंह खाडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता सुरेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, जल अभियंता हर्षजित घाडगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, नगरसेवक बबन मोकाशी आदी उपस्थित होते.



























































