नगरच्या अमरधान स्मशानभूमीत मृतदेहाची हेळसांड

582

नगर येथील अमरधाम स्मशानभूमीध्ये अनेकदा विज खंडीत होतो, कधी स्पिकर बंद असतो, कधी विद्युत दाहिनी बंद असते असे एक ना अनेक प्रकार दररोज घडत असतात. मात्र, आता अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला. परंतु हे प्रकार सर्व थांबणार कधी आणि कोण थांबवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशिरा एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आला होता. सकाळी काही नागरिक दशक्रिया विधीनिमित्त अमरधाममध्ये आले असता त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीस पोलीस आणि नगरसेवकांना फोन करुन याबाबतची माहिती दिली.

याबाबतची माहिती समजताच नवग्रह मित्र मंडळाचे अमोल बनकर व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी हा प्रकार पाहिला. अर्धवट जळालेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह पुन्हा चितेवर नेवून पुन्हा विधीवत दहनविधी केला. या घटनेमुळे अमरधाममधील सुविधा व सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एखाद्या मृतदेहाची विटंबना ही संतापजनक बाब असून अमरधाम स्मशानभूमीची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळलेली असल्याने मोकाट कुत्रे व जनावरांचा या ठिकाणी नेहमीच वावर असतो. त्यातूनच अशा घटना होत असतात त्यामुळे याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी अजय चितळे यांनी केली.

विद्युतदाहिनी तातडीने सुरू करणार – महापौर बाबासाहेब वाकळे
अमरधाम मधील मृतदेहाच्या विटंबनेचा प्रकार समजताच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अमरधाममध्ये पाहणी केली. तसेच दुपारी तातडीने विद्युत विभाग, आरोग्य विभाग व उद्यान विभागाची बैठक घेतली. या बैठकीत अमरधाममध्ये करावयाच्या आवश्यक सोयी-सुविधांबाबत मंजूर असलेली 40 लाखांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अमरधाममधील बंद असलेली विद्युत दाहिनी तातडीने सुरू केली जाईल. या विद्युतदाहिनीसाठी पुर्वी 1200 रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता 900 रुपये आकारण्यात येईल. तसेच बोरा ट्रस्टच्या मार्फत आणखी एक विद्युतदाहिनी बसविली जाणार असून तीही लवकरच कार्यान्वित होईल असेही महापौर वाकळे यांनी सांगितले.

कामे न करणाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करा
अमरधाम स्मशानभूमीच्या परिसरात पुन्हा मोकाट जनावरे, भटके कुत्रे दिसल्यास तेथे नियुक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना यावेळी महापौर वाकळे यांनी उद्यान विभाग प्रमुखांना दिल्या. यावेळी उद्यान व विद्युत विभागाचे अनेक कर्मचारी सांगितलेली कामे करत नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे संताप्त झालेल्या महापौर वाकळे यांनी ज्यांना कामे करायची नाहीत व स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे अशा कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज तातडीने मंजूर करावेत, अशा सूचना यावेळी दिल्या. बैठकीस उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, उद्यान विभागाचे शशिकांत नजान, विद्युत विभागाचे पी. एल. शेंडगे, अजय चितळे, संजय ढोणे यांच्यासह बोरा ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या