लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची आक्रमक भूमिका ‘एम फुक्टो’ संघटनेने घेतल्याने प्राध्यापकांचे आंदोलन दुसऱया दिवशीही सुरू होते. त्यामुळे आजही राज्यात अनेक जिह्यांमधील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची उपस्थिती कमी होती.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संपकरी प्राध्यापकांच्या संघटनांशी मंगळवारी चर्चा केली होती. प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या बैठकीचे इतिवृत्त प्राध्यापकांच्या संघटनांना पाठवले गेले, परंतु त्यात कोणतेही ठोस लेखी आश्वासन नसल्याने प्राध्यापकांमध्ये नाराजी कायम आहे. आज पुणे, नाशिक आणि कोकणातील अनेक महाविद्यालये प्राध्यापक नसल्याने बंद ठेवण्यात आली होती. मुंबईत संपाचा परिणाम तितकासा जाणवला नसला तरी आंदोलन कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत मुंबईतील कॉलेजेही बंद ठेवावी लागू शकतात अशी परिस्थिती आहे.

मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार

प्राध्यापकांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया ‘एम फुक्टो’ संघटनेने सरकारकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत माघार घ्यायचीच नाही अशी भूमिका घेतली आहे. बरोबरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचाही निर्णय संघटनेने घेतला आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने या संपाला पाठिंबा न दिल्याने महासंघाचे प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते.