गोरेगावमधील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार, मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा

गोरेगाव परिसरातील महत्त्वाचे विकास प्रकल्प तत्काळ मार्गी लावावेत यासाठी शासनस्तरावरून सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन शिवसेना नेते तसेच मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

शनिवारी गोरेगाव परिसरातील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा देसाई यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. सिद्धार्थ रुग्णालय बंद झाल्यामुळे गोरेगावकरांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हा विषय महत्त्वाचा असून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या. दरम्यान, नवीन इमारत 11 मजल्यांची होणार असून त्यामध्ये 306 खाटा असणार आहेत. तीन वर्षांत हे रुग्णालय गोरेगावकरांच्या सेवेत सुरू होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली. या प्रकल्पाची मार्च 2020 सालामध्ये निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन  सुभाष देसाई यांनी मनपा अधिकार्‍यांना दिले.

हे प्रकल्पही पूर्ण होणार

टोपीवाला प्रसूतीगृहाची पुनर्बांधणी पूर्ण झाली असून जानेवारी 2020 सालापर्यंत त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. या संबंधातील अडचणी वरिष्ठ पातळीवरून सोडण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.

शास्त्रीनगर नाला रुंदीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या. गोरेगाव पूर्वेकडील गुरांचा बाजार हटविण्यासाठी शिवसेनेने बरीच वर्षे आंदोलने केली. त्यानंतर हा बाजार हटवून पालघर येथे स्थलांतरित करण्यात आला. या जागेवर गोरेगाव स्टेशन ते सब वेपर्यंत 180 मीटरचा रस्ता तत्काळ पूर्ण करावा, अशी सूचना  देसाई यांनी केली.

स्वामी विवेकानंद मार्गातील अडथळे दूर करून रस्ता मोकळा करण्याच्या कामास प्राधान्य देण्याची सूचनाही देसाई यांनी यावेळी केली. या बैठकीत मृणाल गोरे उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या