निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या रानभाज्यांचे संवर्धन गरजेचे! कृषीमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन

729

रानमेवा व रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा असून त्याचे संवर्धन गरजेचे आहे. आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक वैभवाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात रविवारी रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी कृषीमंत्री बोलत होते. आदिवासी शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात व प्रमुख शहरांमध्ये हा महोत्सव होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे महत्व अधोरेखित होणार आहे. रानभाज्या कोणतेही रासायनिक खत किंवा मशागतीशिवाय उगवतात. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. या रानभाज्या प्रथिने,पोषणद्रव्यव जीवनसत्वयुक्त असून,इम्युनिटी बुस्टर म्हणून यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो,असे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेतून गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांना सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाईल. गट माध्यम व संस्थांच्या माध्यमातून रानभाज्यांच्या विक्रीसाठी शहरांमध्ये कायमस्वरूपी जागेवर बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेतून शेतीमालाला गोडाऊन,स्टोअरेज,कोल्ड स्टोअरेजही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विमल आचारी, मारूती पवार,मधुकर बांगारे,मनोहर चौधरी, सिताराम चौधरी,अनिल पवार,तसेच आदर्श शेती शेतकरी गट यांचा सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या