पक्ष्यांना पळवण्यासाठी जोन गन्स; सुरत विमानतळावर करावा लागतो 150 वेळा गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या सुरत विमानतळाजवळ झिंगा तलाव असल्यामुळे तेथे असंख्य पक्षी हजारोंच्या संख्येने येत असतात. मात्र त्यामुळे तेथे उतरणाऱ्या आणि तेथून उड्डाण घेणाऱ्या विमानांना हे पक्षी धडकून मोठा अपघात होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी विमानतळ प्रशासनाने आता जोन गन्सचा वापर सुरू केला आहे. विमानांच्या टेक ऑफ आणि लॅण्डिंगआधी जोन गन्सने फायरिंग केल्याने पक्षी उडून जातात.  दिवसभरात जवळपास दीडशे वेळा हा गोळीबार करावा लागतो.

सुरत विमानतळावरून दररोज 46 उड्डाणे होत असतात. त्यामुळे दररोज दीडशे वेळा, एका महिन्यात साडेचार हजार वेळा तर वर्षभरात एकूण 54 हजार वेळा गोळीबार करावा लागतो, असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले. या गोळीबारामुळे दुर्घटना कमी झाल्या आहेत. या वर्षी अशा केवळ 6 दुर्घटना घडल्या आहेत. यात जानेवारीत 1, फेब्रुवारीत 3, एप्रिलमध्ये 1 आणि जुलैमध्ये 1 दुर्घटना घडली आहे.

पक्ष्यांच्या दिशेने फायरिंग

विमानांचे टेक ऑफ आणि लॅण्डिंग ज्या ठिकाणी होणार असते त्या दिशेने हे खास प्रकारचे फायरिंग करून तेथील पक्ष्यांना पळवून लावले जाते. एकूण पाहिले तर सकाळी 6 वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत किमान  ऐंशी वेळा फायरिंग केले जाते, तर दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत किमान साठ ते सत्तर वेळा फायरिंग होते.

चार लाखांच्या पाच गन्स

सुरत विमानतळावर एकूण 5 जोन गन्स बसवण्यात आल्या आहेत. या गन्सची किंमत एकूण चार लाख रुपये आहे. यातील एकेका गनच्या उपकरणांसाठी 80 हजार रुपये खर्च येतो. त्यादृष्टीने पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी दर महिन्याला 7 हजार रुपये लागतात. गन्सच्या मेंटेनन्सचा खर्च दर महिन्याला 10 हजार रुपये एवढा आहे.