‘फसण’वीस सरकार हाय हाय…भूमिपुत्र रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कल्याण

27 गावांसाठी स्वतंत्र पालिका, सहा हजार कोटींचे पॅकेज, ग्रोथ सेंटर, बंद असलेली दस्तनोंदणी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही आश्वासन पाळले नसल्याचा संतापाचा आज उद्रेक झाला. शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोकळ घोषणेचा निषेध केला. यावेळी ‘फसण’वीस सरकार हाय हाय…27 गावांना म्हणतात नाय नाय अशा घोषणांनी कल्याण-शीळ मार्ग दणाणून गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर 27 गावांसाठी सहा हजार कोटी रुपये पॅकेजची घोषणा केली. शिवाय ग्रोथ सेंटरसाठी 1 हजार 89 कोटी देण्याची घोषणा केली. यानंतर वर्षभरातच त्यांनी 27 गावांची स्वतंत्र पालिका करण्याची दुसरी घोषणा केली. शिवाय बंद असलेली दस्तनोंदणी पुन्हा सुरू करण्याचेही संघर्ष समितीला आश्वासन दिले. मात्र गेल्या चार वर्षांत त्यांनी एकही आश्वासनपूर्ती केली नाही. यामुळे आज शेकडो भूमिपुत्रांनी कल्याण-शीळ मार्गावर रास्ता रोको केला.