
वेतनासाठी अन्नत्याग करत नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर उपोषणाला बसलेल्या आणखी चार शिक्षकांची प्रकृती आज खालावली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. संतापलेल्या आंदोलकांनी गुडघ्यावर चालून आणि लोटांगण घालून यावेळी निर्दयी सरकारचा निषेध नोंदवला.
शालार्थ ओळखपत्र घोटाळा समोर आल्यापासून सरकारने शिक्षकांचे वेतन थांबवले आहे. त्याविरोधात शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांनी शालार्थ ओळखपत्रासंदर्भातील कागदपत्रे सादर केल्यास त्यांचे वेतन काढले जाऊ शकते असे शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी आंदोलकांना सांगितले. मात्र संबंधित कागदपत्रे आम्ही आधीच शिक्षण विभागाला सादर केली असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यावर ती कागदपत्रे गहाळ झाल्याचे सावरकर यांनी सांगताच आंदोलकांच्या सहनशक्तीचा अंत झाला.



























































