वेळापूर अत्याचाराच्या निर्षधार्थ कडकडीत बंद; रास्ता रोको यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून व फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मंगलवारी कोळपेवाडी पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी बुधिष्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल,भीम क्रांती ग्रुप व विविध संघटनांनी वेळापूर, सुरेगाव, कोळगाव, थडी, गौतमनगर, कोळपेवाडी, मंजूर, माहेगाव, देशमुख मढी, कोळगाव पाटी, देर्डे, शहाजापूर सर्व ग्रामस्थांनी निकमनगर सुरेगाव रोड येथून निषेध मोर्चा काढत शिर्डी लासलगाव रोड येथे रास्तारोको आंदोलन केले.

शनी मंदिर सुरेगाव चौफुली येथे निषेध सभा घेण्यात आली. पिडीत मुलीला न्याय मिळावा, यासाठी सर्व ग्रामस्थ सर्व समाज बांधव, सर्व पक्षीय संघटना मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत आंदोलनास पाठिंबा दिला. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी सुरेगाव येथील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर दुचाकीवरून एका फार्म हाऊसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी अमोल अशोक निमसेविरूध्द अत्याचार व अ‍ॅक्ट्रोसिटीचा गुन्हाही दाखल केला आहे. मात्र, दोन ते तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.