Video- आंदोलनकर्त्याची खतरनाक शक्कल, पोलिसांच्या अंगावर सोडला ‘सिंह’

854

इराकमध्ये सध्या सरकारविरोधी वातावरण तयार झालं आहे. इराकी नागरिक भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सार्वजनिक सेवा यांच्याबाबतीत सरकारी धोरणांवर नाराज आहेत. त्यामुळे आंदोलन करून ते सरकारचा निषेध करत आहेत.

या निषेधाला रोखण्यासाठी इराकी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कुत्रे सोडायला सुरुवात केली होती. कुत्र्याला घाबरून आंदोलनकर्ते पांगत आणि परिस्थितीवर नियंत्रण आणता येत होतं. पण, एका आंदोलनकर्त्याने अशी खतरनाक शक्कल लढवली की पोलिसांचेच धाबे दणाणले आणि तिथून काढता पाय घेण्याशिवाय त्यांना गत्यंतर उरलं नाही. पोलीस कुत्र्यांचं भय दाखवतात म्हणून त्याने घरी पाळलेला सिंहच सोबत आणला होता. कुत्रे अंगावर सोडल्यानंतर किती भीती वाटते, याचा प्रत्यय देण्यासाठी त्याने सिंहाच्या गळ्यात अडकवलेली साखळी हातात धरली आणि तो शांतपणे पोलिसांच्या दिशेने चालत गेला.

इतका मोठा सिंह आपल्या दिशेने येताना पाहून पोलिसांची भीतीने गाळण उडाली. ते मागे मागे सरकू लागले. पोलिसांना खरंतर त्याला थांबवण्याची इच्छा होती, पण भीतीपोटी त्यांना काही सुचेना आणि ते मागच्या मागे पळून गेले. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या