
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सत्ताधारी आमदारांप्रमाणेच विरोधकांना निधी मिळावा आणि विधिमंडळातील कामकाजातही समान संधी मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे नेते व विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू व ऍड. अनिल परब, आमदार सचिन अहिर, महेश सावंत, कैलास पाटील, प्रवीण स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, नितीन राऊत, ज्योती गायकवाड आदी उपस्थित होते.
विरोधी पक्षाच्या आमदाराला निवडून दिले म्हणून जनतेला निधी देणार नाही का?
विरोधी पक्षाच्या आमदाराला निवडून दिले म्हणून जनतेला निधी देणार नाही का? असा सवाल करत शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी निधीवाटपात दुजाभाव करणाऱया सरकारला विधानसभेत जाब विचारला.
विरोधकांच्या मतदारसंघातील जनता ही महाराष्ट्रातच राहते. जनतेने विरोधी पक्षाच्या आमदाराला निवडून दिले ही काय जनतेची चूक आहे का? लोकशाहीत त्यांना अधिकार होता. त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना निवडून दिले म्हणून त्यांना निधी द्यायचा नाही आणि त्यांच्या भागातल्या विकास योजना बंद करायच्या हे योग्य नाही, विरोधी पक्षाच्या आमदारांनाही सत्ताधारी आमदारांप्रमाणे निधी द्या, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.



























































