कोट्यवधी रुपयांचा खर्च; पण ऑलिम्पिक पदक दूरच! महान धावपटू पी. टी. उषा यांची खंत

575

सध्याच्या हिंदुस्थानातील ऍथलेटिक्समधील परिस्थितीवर महान धावपटू पी. टी. उषा यांनी आपले मत व्यक्त करताना नाराजी बोलून दाखविली. ‘या घडीला कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. 1998 सालापासून परदेशी प्रशिक्षकांनाही हिंदुस्थानात बोलावून खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, तरीही ऍथलेटिक्समध्ये हिंदुस्थान पिछाडीवर आहे. ऑलिम्पिक पदकाच्या जवळदेखील खेळाडू पोहोचू शकलेले नाहीत,’ अशी खंत पी. टी. उषा यांनी  टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

“ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’ व ‘साई’कडून प्रयत्न करण्यात येत आहेत; पण हिंदुस्थानी खेळाडू पदकापासून दूरच आहेत, हे मान्य करायला हवे. 2024 किंवा 2028 ऑलिम्पिकमध्ये कदाचित परिस्थिती बदलेल. कोणास ठाऊक, ऍथलेटिक्समध्ये पदके मिळविलीही जातील,’ अशी आशाही पी. टी. उषा यांनी पुढे बोलून दाखविली.  

राजकारणाचा फटका

‘हिंदुस्थानातील राजकारणाचा फटकाही खेळाडूंना बसत आहे. ग्रासरुटस्तरावर खेळाडूंची योग्य प्रकारे चाचणी केली जात नाही. राष्ट्रीय क्रीडा संघटनांतील पदाधिकार्‍यांच्या मर्जीतील खेळाडूंनाच चांगला सराक करण्याची संधी दिली जाते. ज्या खेळाडूंमध्ये खरोखरच गुणवत्ता आहे, अशा खेळाडूंना डावलण्यात येते. ही परिस्थिती बदलायला हवी. केव्हा बदलेल माहीत नाही. तोपर्यंत अपयशाचा सिलसिला सुरूच राहील,’ असे स्पष्ट अन् परखड मत पुढे पी. टी. उषा यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या