
मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. शहरांमधले सर्व प्रमुख रस्ते, चौक आणि गल्लोगल्लीत सकाळ-संध्याकाळ निघणाऱया उमेदवारांच्या प्रचार रॅली, तसेच छोटय़ा-मोठय़ा सभांमुळे सर्वत्र निवडणूकमय वातावरण झाले आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्यभरात सुरू असलेली ही रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी 5ः30 वाजता संपणार असून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका आणि राजकीय डावपेच रंगण्यास सर्वत्र सुरुवात होईल.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी रोजी थंडावणार आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युती, भाजप-शिंदे गटाबरोबरच अजित पवार गट, काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीबरोबरच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असणारे इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ठिकठिकाणी बाईक रॅली, रोड शोचे आयोजन केले आहे. यामुळे उद्याचा मंगळवार राजकीय वातावरणामुळे गजबजून जाणार आहे.
प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. महानगरपालिका निवडणुकांत मतदानाच्या 48 तास अगोदर म्हणजे 13 जानेवारीला सायंकाळी 5.30 वाजता प्रचार बंद होईल. त्यानंतर प्रचारांच्या जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणसुद्धा करता येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
रात्रीपासून छुपा प्रचार
जाहीर प्रचार बंद होणार असला तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार करण्यात येतो. राजकीय डावपेचांसाठी उमेदवारांच्या गुप्त बैठका उद्यापासून सुरू होतील. मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्त्वाचे असल्याने निवडणूक विभाग, पोलीस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय राहणार आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवरही त्यांची नजर राहणार आहे.
सोशल मीडियावर नजर
मतदारांपर्यंत झटपट पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी छोटय़ा–छोटय़ा रील्सच्या माध्यमातून आपले म्हणणे सहजपणे मांडत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. जाहीर प्रचार बंद झाल्यावर सोशल मीडियाद्वारे होणाऱया प्रचारावर निवडणूक विभागाच्या पथकांकडून नजर राहणार आहे.





























































