पुल महोत्सवात स. न. वि. वि.!

532

आज ‘हिमालयाची सावली’ने सांगता

बालदिनाचे औचित्य साधून पु. ल. कला महोत्सवात ‘सप्रेम नमस्कार विनंती विशेष’ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. लोप पावत चाललेल्या पत्रलेखन संस्कृतीचे संवर्धन करणे हा उपक्रमाचा हेतू आहे. याअंतर्गत मुलांना आज पोस्टकार्डचे वाटप करण्यात आले. उद्याही करण्यात येणार आहे. पोस्टकार्ड मिळालेल्या मुलाने त्याच्या जवळच्या कोणत्याही एका व्यक्तीला पत्र लिहायचे आहे. ज्या व्यक्तीला हे पत्र लिहिले जाईल त्या व्यक्तीने पुढे त्याच्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावे असे अभिप्रेत आहे.

8 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या ‘पु. ल. कला महोत्सव 2019’ चा समारोप उद्या, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता रवींद्र नाटय़मंदिर येथे होणार आहे. यावेळी अभिनेते भरत जाधव व सिद्धार्थ जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगरानी, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे उपस्थित राहतील. ‘हिमालयाची सावली’या नाटकाने महोत्सवाची सांगता होईल.

रसिकांचा भरभरून प्रतिसाद

‘पु. ल. कला महोत्सव 2019’ अंतर्गत विविध कला आविष्कारांवर आधारित दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला अनेक रसिकांनी भेटी दिल्या. अभंग रिपोस्ट या पारंपरिक शास्त्राrय–रॉक संगीत पद्धतीवर झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन झाले होते. महोत्सवात ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक, इला भाटेंची ‘पै पैशाची गोष्ट’, सलील कुलकर्णी यांचा ‘बाकीबाब आणि मी’, सावनी शेंडेचा ‘इर्षाद’, मेघा घाडगेचा लावणीचा कार्यक्रम, रेश्मा कारखानीसांची कविता, साहित्य संघाचे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’, ग्रेस यांच्यावर बेतलेली कलाकृती ‘कवी जातो तेव्हा’, ‘काजव्यांचा गाव’, ‘गुगलीफाय’ नाटक, ‘लाली’ एकांकिका, देवानंद माळी यांचा लोककला कार्यक्रम, ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्चे नाटय़ सादरीकरण, लहान मुलांसाठीचे कार्यक्रम व कार्यशाळा अशा अनेक कलाकृतींना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

आपली प्रतिक्रिया द्या