
पुणे शहरातील विविध भागात पार्क केलेल्या मोटारींच्या काचा फोडून टेपरेकॉर्डर चोरून नेण्यात येत असल्याचे सत्र कायम आहे. मागील दोन दिवसात चोरट्यांनी गुलटेकडी, बिबवेवाडी, बाणेर रस्ता, सेनापती बापट रस्ता, येरवडा परिसरातून 20 मोटारींच्या काचा फोडून टेप चोरण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, टेपचोरीच्या घटनांमुळे हद्दीतील पेट्रोलिंग आणि बीट मार्शल यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री गुलटेकडी, महर्षीनगर, बिबवेवाडी परिसरातील रस्त्यावरील मोटारींच्या काचा फोडून हजारो रूपयांचे टेपरेकॉर्डर गायब केले आहेत. गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या जगदीश ढोके वय 32 यांच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी 11 हजारांचा टेप चोरून नेला. त्याशिवाय दीनेश खराडे यांच्यासह एका महिलेच्या मोटारीची काच फोडून मिळून 28 हजारांची साउंड सिस्टीम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी मार्केटयार्ड आणि बिबवेवाडी परिसरातील चार मोटारींच्या काचा फोडून साउंड सिस्टीम चोरून नेले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या 20 मोटारींच्या काचा फोडून कारटेप लांबविण्याची घटना घडल्या आहेत.
अशी केली जातेय चोरी
मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांकडून परिसरातील रेकी केली जात आहे. त्यानंतर कटावणीच्या साह्याने मोटारीच्या काचा फोडून साउंड सिस्टीम चोरी केली जात आहे. एकाच परिसरातील चार ते पाच मोटारींतून सलगपणे टेप चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार होत आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकारांमुळे मोटारचालकांनी चिंता व्यक्त केली आहे.



























































