पुणे-बंगळूर महामार्गावर अपघात; आठ वाहने एकमेकांना धडकली, पाच जण जखमी

कात्रज परिसरातील पुणे बंगळूर महामार्गालगत असणाऱ्या सर्विस रस्त्यावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातात सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकली असून अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर महामार्गावरील जांभुळवाडी रस्त्यावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर एका वाहनाला धडकला. यामध्ये चालक आणि क्लीनर अडकून पडले होते. त्यांची सुटका करण्याचे काम सुरू असताना पाठीमागे आणखी काही वाहने टाकली होती. या वाहनांना पाठीमागून आलेल्या आणखी एका कंटेनरने धडक दिली. त्यामुळे पुढील सर्व वाहने एकमेकांवर धडकून हा विचित्र अपघात झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन  अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची सुटका केली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर या मार्गावर काहीवेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या