पुणे-बंगळुरू हायवे सुरू; पेट्रोल,डिझेल, गॅससह पाण्याचे टॅंकर शहरात दाखल

कोल्हापुरात महापुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून बंद राहिलेला पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आज चौथ्या दिवशी सुरू झाला. त्यामुळे पेट्रोल,डिझेल,गॅससह पाण्याचे टॅंकर शहरात दाखल होत आहेत. काल दुपारी पुलाची शिरोली पासुन कोल्हापूर- पुणे-मुंबई हा मार्ग सुरू झाला. तर आज साडेदहाच्या सुमारास पुलाची शिरोली पासुन बेळगावच्या दिशेने हा एकेरी मार्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर अडकुन पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी सध्या प्रवाशी वाहतूक पुर्णपणे बंद आहे. केवळ अवजड वाहनेच ये-जा करण्यास पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी असुन, पंचगंगेची पाण्याची पातळी रेकॉर्डब्रेक 56 फुट 3 इंचावरुन आज सकाळी 11 वाजता 48 फुट 6 इंचावर आली होती. त्यामुळे पुरपातळी तासाला एक-दोन इंचाचे कमी होत आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली आणि सांगलीफाटा येथे आज सकाळी पुन्हा एकदा कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे एक फूट पाण्यातून पोकलेनने अंदाज घेण्यात आला. त्यानंतर पाण्याचा टँकर प्रथम सोडण्यात आला. पाठोपाठ पेट्रोल,डिझेल, दूध, ऑक्सिजन व मालवाहतूक अशी अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहणे सोडण्यास प्राधान्य देण्यात आले. महामार्गावर एका बाजूला सुरक्षीततेसाठी पॉकलॅडही उभा करण्यात आला आहे.

दरम्यान महापुराच्या काळात शहरातील बहुतांश सर्वच पेट्रोल डिझेल पंप रिकामे झाल्याने, प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. पण आज अत्यावश्यक सेवेतील पेट्रोल,डिझेल,गॅस चे टॅंकर मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, पेट्रोल डिझेल चा प्रश्न सुटला असला तरी पंपावर वाहनधारकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे.

पुणे महापालिकेचे पाण्याचे टँकर दाखल

पुरामुळे महानगरपालिकेच्या पंपींग हाऊस मधील पंप पाण्यात गेल्याने, उपसा बंद होऊन गेल्या चार तीन चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी चार फुट पाण्यात उतरुन, पंपीग हाऊसमधील मोटारी पाण्याबाहेर काढून, हिटिंगसाठी औद्योगिक वसाहतीत पाठवत आहेत. एकीकडे महापालिका नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत असताना आज पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुरू होताच पुणे महानगरपालिकने पाठविलेले पाण्याचे टॅंकर शहरात दाखल झाले.
त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा करणे शक्य झाले.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे बंद

रविवारी ऐतिहासिक राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे दुपारी चार नंतर रात्री उशिरा पर्यंत एका पाठोपाठ काही अंतराने उघडले. दुपारी 1:45 पर्यंत राधानगरी धरणाचे गेट क्रमांक 3,4, 6,7 बंद झाले आहेत. तर गेट क्रमांक 5 सुरू असुन, 1 हजार 428 क्युसेक व विद्युत गृहातुन 1 हजार 400 असा एकुण 2 हजार 828 क्युसेक विसर्ग सुरू होता. संध्याकाळपर्यंत हा दरवाजाही बंद होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या