मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱया पुणेकरांना आज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अचानक सुरू झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपले. दोन ते तीन तास ढगफुटीसदृश कोसळलेल्या पावसाने पुणेकरांची भंबेरी उडाली. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील रस्ते जलयम झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. अनेक भागांतील घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठादेखील कित्येक तासांपासून खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने शहर अंधारमय झाले होते. ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱया पुणे शहराची मान्सूनच्या पहिल्या पावसातच दाणादाण उडाल्याने पुणे महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याचे पितळ उघडे पडले असून, महापालिकेच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहरासह जिह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. मात्र, आज दुपारी 4नंतर अचानक जमून आलेल्या ढगांनी रौद्ररूप धारण केले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची भंबेरी उडाली. शहरातील पाषाण, बी. यू. भंडारी शोरूम, सिंहगड रोड, सेंट्रल मॉल, नारायण पेठ, खडकी, एरंडवणा, गणेशनगर, राजेंद्रनगर, कसबा पेठ भागातील पुंभारवाडा, टिंबर मार्पेट येथे मोठय़ा प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते.
ढगफुटीसदृश पाऊस
पुणे शहरात आज ढगफुटीसदृश पाऊस पडला. आज रात्री 8.30 वाजेपर्यंत शिवाजीनगर भागात 101.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, वडगाव शेरी भागात 61.5, एनडीए भागात 45.5, मगरपट्टा भागात 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरातील विविध भागांतील घरांमध्ये शिरले पाणी
काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचे पाणी धानोरी परिसरातील घरांमध्ये शिरल्याची घटना घडली होती. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसामुळे गंज पेठ, टिंबर मार्केट यांसह शहरातील प्रमुख पेठांमधील अनेक घरांमध्ये, तसेच दुकानांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरले. तसेच, पाषाण, सिंहगड रोड भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या, तसेच विविध सोसायटय़ांच्या तळमजल्यावर पाणी साचल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे आल्या आहेत.
रस्त्यांचे झाले तळे; प्रचंड वाहतूककोंडी
अतिमुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने शहरातील विविध भागांमध्ये प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांना तासन्तास एकाच ठिकाणी थांबावे लागले. रस्ते, नाले, सोसायटय़ांमध्ये पाणी साचल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यात दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील मध्यवर्ती भागासह आरटीओ, सिंहगड रस्ता, पुणे स्टेशन, डेक्कन, कोथरूड, स्वारगेट, कात्रजसह अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना रस्त्यावरून मार्ग काढणे अवघड झाले होते. प्रचंड पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूककोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वाहने पावसामध्ये अडकून पडली होती, तर काही वाहनचालकांना गाडी बंद पडल्यामुळे गुडघाभर पाण्यातून गाडी ढकलत घेऊन जाण्याची वेळ आली.
रस्त्यावरच ‘स्विमिंग पूल’! कंबरेएवढ्या पाण्यातच क्रिकेट
पुणे शहरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही सखल भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती रस्त्यावर वाहणाऱया पाण्यात झोपून पोहत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर, टिंबर मार्केट येथे कंबरेएवढ्या पाण्यात काही लहान मुले क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. काही भागांत तरुण थर्माकॉलवर बसून पोहण्याचा आनंद लुटत होते.
‘पीएमपीएल’ची वाहतूक विस्कळीत
मुसळधार पावसामुळे गटारी व नाले ओसंडून वाहत होते. पावसामुळे ‘पीएमपीएल’ बसेस काsंडीत अडकून पडल्या होत्या. त्यामुळे पीएमपीएल प्रवासीसेवा काही वेळ ठप्प झाली होती. रस्त्यांवरील चेंबर्स ओसंडून वाहत असल्याने वाहनचालकांना कसरत करीत जावे लागले.
पाच तास बत्ती गुल
मुसळधार पावसामुळे शहरातील शुक्रवार पेठ, स्वारगेट परिसर, सदाशिव पेठ व इतर काही भागांत जवळपास चार ते पाच तास बत्ती गुल झाली होती. पावसाबरोबर जोरदार वारे वाहत होते. त्यामुळे काही ठिकाणी विजेच्या वायर तुटून पडल्या होत्या. तर, शुक्रवार पेठेत मेन लाइनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे दुपारी दोनपासून रात्री आठपर्यंत या भागात बत्ती गुल झाली होती. एकीकडे जोरदार पाऊस, तर दुसरीकडे बत्ती गुलमुळे ग्राहक मात्र कात्रीत सापडले होते. पाऊस झाला तरी उकाडा मात्र वाढला होता. बत्ती गुलमुळे रस्त्यावरील सिग्लनचा खेळखंडोबा झाला होता. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूकोंडी झाली होती.