पुणे शहरात घरफोडीचे सत्र कायम! नऱ्हे, बिबवेवाडी, ताडीवाला रस्ता परिसरात चोरी

पुणे शहरात घरफोडीचे सत्र कायम असून चोरट्यांनी ताडीवाला रस्ता, नऱ्हे आणि बिबवेवाडीतील बंद घराचे कुलूप तोडून तब्बल 8 लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी बंडगार्डन, सिंहगड आणि बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून 2 लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 10 ते 16 जूनदरम्यान ताडीवाला रस्त्यावरील पिनॅकल इमारतीत घडली. याप्रकरणी अनुप जोगदंड (वय 33) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी नऱ्हेतील चाकणकर कॉर्नर इमारतीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून 1 लाख 16 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 13 जूनला घडली असून सागर ढमे (वय 30) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोटारीच्या सर्व्हिस सेंटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, होम थिएटर, गाडीचा गिअर बॉक्स असा मिळून 4 लाख 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 16 जूनला बिबवेवाडीतील ऑटो लाउंज फोर व्हिलर सर्व्हिस सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी हार्दिक मेहता (वय 36, रा. महर्षीनगर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यश बोराटे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या