लढाई जिंकण्यासाठी झोकून देऊन काम करा! पुणे लवकरच कोरोनामुक्त होईल – मुख्यमंत्री

970

प्रशासकीय यंत्रणेतील समन्वय हा कोरोना रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. क्वारंटाइन सुविधांचे नेटके व्यवस्थापन, ट्रकिंग आणि टेस्टिंगही मोठय़ा प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर शून्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबरोबरच कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले, तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आमदार डॉ. नीलम गोऱहे, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी दुवा बनावे

कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील पहिली लाट संपलेली नसून, आणखी किती लाट येईल, याबाबत माहिती नाही. मात्र, आता आपल्याला कोरोनासोबत जगायला पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून भूमिका बजवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

जिह्यात टास्क फोर्स

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहर आणि जिह्यातील कोरोना परिस्थिती जाणून घेऊन खासदार, आमदार यांच्याशी चर्चा करून अडचणी आणि सूचना विचारात घेतल्या.

ते म्हणाले, मुंबईत तातडीने टास्क फोर्स स्थापन केल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत झाली. प्रत्येक जिह्यात असा टास्क कोर्स तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या