
दस्तवार शिक्के मारून सही करण्यासाठी तक्रारदाराकडून साडेसात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वडगाव मावळातील दस्त नोंदणी कार्यालयाच्या सब रजिस्टारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
जितेंद्र बडगुजर असे रंगेहात पकडण्यात आलेल्या सब रजिस्टारचे नाव आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र हे वडगाव मावळ येथील रजिस्टार कार्यालयात सब रजिस्टार आहेत. काही दिवसांपुर्वी तक्रारदार यांनी दस्त नोंदणीसाठी अर्ज केला होता. दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यावर शिक्के मारून देण्यासाठी जितेंद्र यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली असता जितेंद्र यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच स्वीकारताना जितेंद्र यांना एसीबीने रंगेहात पकडले आहे.
































































