पुणे – जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक, 5 मोटारी, 3 दुचाकींसह 9 लाखांचा ऐवज जप्त

शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जबरी चोरी आणि घरफोडी करीत वाहनचोरी करणाऱ्या दोघा सराईतांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केले. त्यांच्याकडून 5 मोटारी, तीन दुचाकींसह 9 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24, रा. मोहमंदवाडी ) आणि नागेश मनोहर वाकडे (वय 20, रा. वाडकर चाळ, मोहमंदवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी विनानंबर प्लेट दुचाकीवर दोघेजण प्रवास करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पथकाने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी भारती विद्यापीठ परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. त्याशिवाय आणखी दोन साथीदारांच्या मदतीने त्यांनी वानवडीत जबरी चोरी केल्याचेही निष्पन्न झाले आहे. सराईत आरोपी आजिनाथ गायकवाड याच्याविरूद्ध 15 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, कांबळे, रामाने, अभंगे, लोखंडे, खान, काळभोर, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या